लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कापूस खरेदी योजनेंतर्गत कापूस पणन महासंघ व सीसीआयमार्फत नागपूर जिल्ह्यातून १८ लाख ६४ हजार १८९ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. पण नागपूर जिल्ह्यात कापसाचे उत्पादन अंदाजे ३०.७६ लाख क्विंटल झाले आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या घरात १५ टक्के कापूस शिल्लक आहे. पावसामुळे खरेदी केंद्र बंद झाली आहे. कापसाच्या ग्रेडिंगवर परिणाम झाला आहे. खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव पाडले आहेत. त्यामुळे अजूनही घरात कापूस ठेवलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ८९ हजार ९२४ शेतकऱ्यांकडून सरकारने कापसाची खरेदी करण्यात आली. जिल्ह्यातील दहा तालुक्यात कापूस पणन महासंघ व सीसीआयमार्फत जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये कापसाची खरेदी करण्यात आली. कापूस पणन महासंघाने जिल्ह्यात ६ लाख ६५ हजार क्विंटल खरेदी केली. उर्वरित खरेदी सीसीआयमार्फत करण्यात आली. पाऊस सुरू झाल्याने सध्या सरकारी खरेदी बंद करण्यात आली आहे. सरकारने यंदा कापसाला ५५५० रुपये हमीभाव दिला होता. पण यावर्षी खरेदी उशिरा सुरू झाली आणि केंद्रही अपुरे सुरू केले होते. त्यामुळे अजूनही अनेक शेतकऱ्यांचा कापूस विकल्या गेला नाही. आतातर पाऊस सुरू झाल्याने शिल्लक कापूस सरकार खरेदी करणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सरकारी खरेदी केंद्र बंद झाल्याने व्यापाऱ्यांनीही कापसाचे भाव पाडले आहेत. २९०० रुपयांपासून ४४०० रुपयांपर्यंत व्यापारी कापसाला भाव देत आहेत. शेतकऱ्यांजवळ साठवणुकीची सुविधा उपलब्ध नसल्याने मिळेल त्या भावात आता शेतकरी कापसाची विक्री करीत असल्याची परिस्थिती आहे.कापूस न विकल्यामुळे कर्जही मिळत नाहीहिंगणा तालुक्यातील शेतकरी नारायण बुंदे म्हणाले, माझ्याकडे ४ एकर शेती आहे. यंदा ४० क्विंटल कापूस झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २९ एप्रिलला नोंदणी केली. परंतु अजूनही कापूस विकल्या गेला नाही. त्यामुळे बँकेकडून घेतलेले पीक कर्ज अजूनही भरले नाही. बँकेकडे चौकशी केली असता, जुने कर्ज भरा, नंतर नवीन कर्ज मिळेल असे सांगण्यात आले. त्यामुळे शेती करताना आता अडचण निर्माण झाली आहे.लवकरात लवकर खरेदी करावीशिल्लक कापूस खरेदी करण्याची हमी सरकारने घेतली आहे. पण आता पावसाचा परिणाम कापसाच्या ग्रेडिंगवर होणार आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर खरेदी करून, शेतकऱ्यांना हमीभावाप्रमाणे रक्कम द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे राम नेवले यांनी केली आहे.
१५ टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 7:41 PM