लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवालामधील १५ कोटी रुपयांची रक्कम चोरण्याची योजना अयशस्वी झाल्यावर या घटनेतील साहित्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात गुंडांची टोळी पोलिसांच्या हाती लागली. तेलंगखेडीतील या टोळीमधील चार सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
हे आरोपी सोमवारी रात्री अंबाझरी उद्यानाच्या गेटजवळ संशयास्पद स्थितीत पोलिसांना आढळले. त्यांच्या कॉलेज बॅगची तपासणी केली असता हार्ड डिस्क, मॉनिटर, आरी, चाकू, दोरी, पेचकस, मोबाईल आदी साहित्य सापडले. त्यांना ठाण्यात आणून चौकशी केल्यावर ६ ऑक्टोबरला गिट्टीखदान परिसरातील फ्लॅटमध्ये केलेल्या चोरीत वापरलेले हे साहित्य असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी हे साहित्य अंबाझरी तलावात फेकण्यासाठी ते आले होते. रवींद्र पटले यालाच ही सर्व योजना माहीत होती, असे त्यांनी सांगितले.
काय आहे प्रकरणा -
हे संपूर्ण प्रकरण पोलिसांना चक्रावून सोडणारे होते. हजारी पहाड येथे एका वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा फ्लॅट आहे. पटलेने दोन वर्षांपूर्वीच या फ्लॅटमधून दीड कोटी रुपयांची चोरी केली होती. याच ठिकाणी हवालातील १५ कोटींची रक्कम असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानंतर त्याने ही रक्कम चोरण्याची योजना आखली.
पटले ६ ऑक्टोबरच्या रात्री सहकाऱ्यांसोबत अपार्टमेंटमध्ये पोहचला. त्यांनी आधी तिसऱ्या माळ्यावरील एका फ्लॅटचे कुलूप तोडले. यानंतर एका दोरीच्या साहाय्याने ते चौथ्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये शिरले. याच फ्लॅटमध्ये १५ कोटी रुपये असल्याची टीप होती. या फ्लॅटच्या तीनही दारांवर लागलेले कुलूप तोडून आरोपी आत शिरले तेव्हा त्यांना नोटांऐवजी खर्ड्यांचे रिकामे बॉक्स मिळाले. खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे लागले होते. आपण पकडले जाऊ या भीतीने आरोपींनी डीव्हीआर चोरी केला. फ्लॅट मालकाने दुसऱ्या दिवशी गिट्टीखदान पोलिसात तक्रार दाखल केली. महागड्या वस्तूंची चोरी न झाल्याने पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. आता रवींद्रच्या अटकेनंतरच सत्य समोर येईल.
अटकेतील आरोपींमध्ये विशाल शालिकराम चचाने (२३), आकाश ऊर्फ डुंबक सुरेश नेवारे (२२), आकाश ऊर्फ छोटू शंकर पाल (१९) आणि राकेश श्रावणजी लिल्हारे (२७) तेलंगखेडी यांचा समावेश आहे. त्यांचा सूत्रधार रवींद्र पटले आणि अन्य एक सहकारी फरार आहे. आरोपींविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, लुटमार आदींसह अन्य गुन्ह्याची कलमे लावली आहेत.