- सुमेध वाघमारेनागपूर - मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण असूनही मागणी व पुरवठा यातील कमालीची तफावत आहे. हजारो रुग्णांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध होऊ शकत नसल्याने ते मृत्यूच्या दाढेत जगत आहेत. सध्याच्या स्थितीत भारतात दीड लाख मूत्रपिंडाची गरज असताना केवळ पाच हजार मूत्रपिंड उपलब्ध होतात. ५० हजार हृदयाची गरज असताना १०-१५ मिळतात तर ५० हजार यकृताची गरज असताना ७०० उपलब्ध होतात. परिणामी, एकेका अवयवासाठी अनेक दिवस वाट बघत आयुष्य कंठणाऱ्यांची संख्या वाढतच असल्याचे वास्तव आहे.कुणाचा अपघात होतो, कुणावर संकट येते, कुणाचे अवयव अचानक निकामी होतात, त्यांना वेळीच अवयव मिळाले नाही तर त्यांचे आयुष्य थांबते. कुण्या दात्याचे अवयव प्राप्त झाले, त्याचे प्रत्यारोपण झाले तर त्याला नवे जीवन मिळू शकते, परंतु भारतात अवयवदान करण्याबाबत फारशी जागृती नाही. उलट आॅस्ट्रेलिया, स्पेन, अमेरिकेसारख्या देशांनी अवयवदान चळवळीचे महत्त्व पूर्वीच ओळखून त्याविषयी वैद्यकीय, शासन व सर्वसामान्य जनता अशा तिन्ही पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती घडवून आणली आहे. त्यामुळे आज त्यांच्याकडे हजारो लोकांचे प्राण वाचत आहेत.भारतात अवयवदानाचा टक्का मात्र प्रति १० लाख लोकांमागे केवळ ‘३४’ टक्के आहे. अलीकडच्या काळात हा टक्का वाढला असला, तरी तो फार कमी असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.सहा वर्षांत ३६ मेंदूमृतांकडून अवयव दाननागपूर विभागातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये आठवड्यात दोन-तीन मेंदूमृत (ब्रेनडेड) रुग्णांची नोंद होते. ‘ह्युमन आॅर्गन ट्रान्सप्लान्ट’ कायद्यानुसार रुग्णालयातील प्रत्येक ‘ब्रेनडेड’ व्यक्तीची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’ने (झेडटीसीसी) देणे बंधनकारक असून, त्यांना अवयवदानासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक असते, परंतु प्रत्यक्षात फार कमी माहिती या समितीला दिली जाते. अनेकदा नातेवाइकांकडूनही प्रतिसाद मिळत नाही. परिणामी, सहा वर्षांत केवळ ३६ ‘ब्रेनडेड’ दात्याकडून मिळालेल्या अवयवांचे प्रत्यारोपण होऊ शकले.स्पेनमध्ये सर्वाधिक अवयवदाननागपूर विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने (झेडटीसीसी) उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक अवयवदान ‘स्पेन’मध्ये होते. येथे प्रति १० लाख लोकांमागे ‘३४ टक्के’ अवयवदान होते. ‘क्रोएशिया’मध्ये ‘३३.५ टक्के’, फ्रान्समध्ये ‘२५ टक्के’, अमेरिकेत ‘२४ टक्के’, आॅस्ट्रेलियामध्ये ‘२३ टक्के’, इटलीमध्ये ‘२० टक्के’, जर्मनीमध्ये ‘१६ टक्के’ अर्जेंटिनामध्ये १२ टक्के होते.
दीड लाख रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत, ५० हजार हृदय व यकृताची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 6:05 AM