कार घेतलीच नाही : कर्जाची रक्कम लंपास, दोघांवर गुन्हे दाखल नागपूर : कार खरेदी करण्याच्या नावाखाली १५ लाखांचे कर्ज घेऊन आरोपींनी ही रक्कम परस्पर हडपली. विशेष म्हणजे, या आरोपींनी एका बँकेला १५ लाखांचा गंडा घालतानाच दुसऱ्या बँकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे खाते उघडून त्या बँकेलाही फसविले. चंपालाल प्रेमलाल शाहू (रा. घरकुल को-आॅप. सोसायटी, बेलतरोडी) आणि विनोद विश्वनाथ सिंगाडे (वय ४६, रा. जुनी आॅईल मिल, गणेशपेठ बसस्थानकाजवळ) अशी आरोपींची नावे आहेत. अजय अरुणराव बरबडे (वय ४९, रा. जयदुर्गा सोसायटी, मनीषनगर) यांनी प्रतापनगर पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, आरोपी शाहू आणि सिंगाडेने संगनमत करून खामला परिसरातील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत इनोव्हा कार घेण्यासाठी कर्ज प्रकरण सादर केले. व्यवस्थापक राजेंद्र तारे यांच्याशी सलगी साधून त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी या कर्ज प्रकरणाच्या फाईलमध्ये अनेक बनावट कागदपत्रे जोडली. एवढेच नव्हे तर वर्धा मार्गावरील सेंट्रल बँक आॅफ इंडियात ग्रेस टोयोटा नावाने खाते उघडले. त्यासाठी सेंट्रल बँकेतसुद्धा बनावट कागदपत्रे सादर केली. कार खरेदीसाठी कर्ज मंजूर झाल्यानंतर कोकण बँकेच्या अधिकाऱ्यांकडून १५ लाखांचा धनादेश घेतला. तो सेंट्रल बँकेत जमा केल्यानंतर ही रक्कम उचलून आरोपी पळून गेले. (प्रतिनिधी)
कोकण ग्रामीण बँकेला १५ लाखांचा गंडा
By admin | Published: October 19, 2016 3:17 AM