मोरेश्वर मानापुरे
नागपूर : आंतरराष्ट्रीय दरानुसार डिझेलचे दर दरदिवशी वाढत आहेत. याशिवाय जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही निरंतर वाढ होताना दिसत आहे. डिझेलच्या वाढत्या दरामुळे माल वाहतुकीचे दर वाढल्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत आहे. कोरोना काळात वाढत्या महागाईने गरीब व सर्वसामान्य आधीच त्रस्त असून लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे. महागाईचा भडका उडाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
कोरोना काळात अनेकजण बेरोजगार बनले आहेत. त्यातच डिझेल आणि आवश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे गरीब व सामान्य नागरिक भरडला जात आहे. खाद्यतेल, तूर डाळ, चना डाळ, तांदूळ, साखर, गूळ आणि बेसनच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. सर्वांना दैनंदिन खर्च चालविणे कठीण बनले आहे. वर्षभरात खाद्यतेलाच्या किमतीत प्रति किलो ६० ते ९० रुपयांची वाढ झाली आहे. सर्वाधिक विकले जाणारे सोयाबीन तेल ९० रुपयांवरून १६५ रुपये, तर सूर्यफूल तेल ९० रुपयांवरून १८० रुपयांवर गेले आहे. स्वयंपाकघरातील फोडणीही महागली आहे. आता उन्हाळ्यात भाज्यांच्या किमतीही हळूहळू वाढत आहेत. फळांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. या सर्व महागाईने गरीब व सामान्यांच्या नाकीनऊ आले आहे. शासनाने गांभीर्याने लक्ष घालून भाव कमी करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
किराणा दर (प्रति किलो, दर्जानुसार)
मार्च २०२० सप्टेंबर २०२० मे २०२१
तूर डाळ ७६ ते ९० ८० ते ९५ ९५ ते १२०
हरभरा डाळ ५५ ते ६५ ६० ते ७० ७० ते ८२
तांदूळ ३५ ते ५५ ३२ ते ५० ३६ ते ६०
साखर ३८ ते ४० ४० ते ४४ ४० ते ४२
गूळ ४० ते ४२ ४० ते ४४ ४८
बेसन ६० ते ६२ ६६ ८४
तेलही दुप्पट महाग (दर प्रति किलो)
मार्च २०२० सप्टेंबर २०२० मे २०२१
शेंगदाणा तेल १४० १४५ १८५
सूर्यफूल तेल ९० १०० १८०
मोहरी तेल १०० १२० १७०
सोयाबीन तेल ९० ९५ १६५
पामतेल ८५ ९० १६०
डिझेल दराचा ग्राफ (भाव प्रति लिटर)
जानेवारी २०२० जून २०२० जानेवारी २०२१ मे २०२१
७२.१५ ६९.३२ ७९.५५ ८८.९२
जीवनाश्यक वस्तूंच्या वाढत्या दरानुसार मालाची विक्री करावी लागते. दरदिवशी वाढत्या दरामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकही त्रस्त आहेत. ठोकमध्येच वाढ होत असल्याने किरकोळ विक्रेत्यांनाही थोडा नफा कमवून विक्री करावी लागते. मालाची आवक बंद असल्याने डाळी आणि धान्याचे भाव वाढले आहेत.
- प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा संघ.
ठोक खाद्यतेल विक्रेते कमी आहेत. त्यांच्याकडून आलेल्या तेलाची किरकोळ विक्रेते विक्री करतात. सततच्या दरवाढीमुळे ग्राहकांना विक्री करताना त्रास होतो. वर्षभरात सर्वच खाद्यतेल प्रति किलो ६० ते ९० रुपयांनी वाढले आहे. माल मुबलक उपलब्ध करून देऊन शासनाने दरवाढीवर नियंत्रण आणावे.
- अनिल अग्रवाल, खाद्यतेल विक्रेते.
जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे महिन्याचे बजेट बिघडले आहे. चार जणांच्या कुटुंबाला वस्तूंच्या खरेदीसाठी दोन हजार रुपये जास्त लागत आहेत. याशिवाय महागाईमुळे इतरही खर्च वाढले आहेत. वस्तूंचे दर कमी व्हावेत.
- कुमुदिनी राऊत, गृहिणी.
महागाईमुळे सर्वच वस्तूंच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. खाद्यतेलाचे दर दुप्पट झाले आहेत. याशिवाय कोरोना काळात औषधांचाही खर्च वाढला आहे. पगारात कपात झाली असून, घरखर्च कसा चालवायचा, ही समस्या आहे.
- शालिनी देव, गृहिणी.