नागपूर : ओबीसी आरक्षण तिढ्यामुळे स्थगित झालेल्या हिंगणा नगरपंचायतीच्या ४ जागांसाठी १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. १८ जानेवारीला येथे निवडणूक होईल. निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार हिंगणा नगरपंचायतीच्या ४ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता.
मंगळवारी (दि.४) ला अर्जांची छाननी होईल. १० जानेवारीपर्यंत संबंधित उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतर येथील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होईल. हिंगणा नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता वॉर्ड क्रमांक १,४,११ आणि १५ साठी १८ जानेवारीला मतदान आहे. यासाठी २९ डिसेंबर २०२१ ते ३ जानेवारी २०२२ पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती.
हिंगण्यात भाजप, राष्ट्रवादी,काँग्रेस व शिवसेना हे चारही पक्ष स्वतंत्र लढत आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी इंदिरा चौधरी, मुख्याधिकारी राहूल परिहार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक होत असलेल्या तीन वॉर्डात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभे केले तर शिवसेनेच्यावतीने वॉर्ड क्रमांक १५ मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. वॉर्ड क्रमांक १ व १५ मध्ये प्रत्येकी १ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.