नागपूर : वऱ्हाडी तयार, नातेवाईकही सजूनधजून पाेहोचले आणि वाजंत्रीही तयार झाले. अशावेळी नवरी, नवरदेवही बाेहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाले हाेते. मात्र, ऐनवेळी जिल्हा बालसंरक्षण समितीच्या अधिकाऱ्यांचे पथक मंडपात धडकले. चाैकशी केली तेव्हा समजले मुलीचे वय १५ वर्षे अन् नवरदेवाचेही वय १८ वर्षे हाेते. कायद्याचा धाक दाखवताच नातेवाईकांचे धाबे दणाणले अन् एक बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले.
हा प्रसंग गुरुवारी कळमना भागात घडला. येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह करण्यात येत असल्याची माहिती चाईल्ड लाईनकडून जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठान यांना मिळाली. याबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा काेल्हे यांना सुचविण्यात आले. त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार बालसंरक्षण पथक कळमन्यातील त्या मंडपात धडकले. त्यांनी वर-वधूच्या जन्माचे दाखले मागितले. त्याची तपासणी केली असता दाेघांचेही वय बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्यात बसत नव्हते. अधिकाऱ्यांनी आईवडिलांची समजूत काढली. शिवाय, अल्पवयात लग्न लावणे कायद्यानुसार गुन्हा असल्याचे सांगत कारवाई करण्याचा इशारा दिला. अधिकाऱ्यांच्या ईशाऱ्याने दाेन्ही बाजूचे पालक, नातेवाईक नरमले आणि हा बालविवाह थांबविण्यात आला.
या कारवाईमध्ये बालकल्याण समिती अध्यक्ष राजीव थाेरात, मुश्ताक पठान, बालसंरक्षण अधिकारी साधना ठाेंबरे, विनाेद शेंडे, पाेलीस उपनिरीक्षक मनाेज राऊत, चाईल्ड लाईनचे नीलिमा भाेंगाडे, सारिका बारापात्रे, अंगणवाडी सुपरवाईजर ज्याेती राेहणकर, अंगणवाडी सेविका राजश्री शेंडे, कांचन काळे, मीरा साखरकर, सुवर्णा घरडे, लक्ष्मी हाडके आदींचा सहभाग हाेता.
- यांच्यावर हाेऊ शकते कारवाई
बालविवाह करण्यात आल्यास आईवडील व नातेवाईकच नाही तर मंडप डेकाेरेशनवाले, आचारी, भटजी, पंडित, माैलवी, लग्नात सहभागी हाेणारे वऱ्हाडीही कायद्याच्या कचाट्यात येऊ शकतात.