अमोल माओकर
नागपूर : ‘साऱ्या बायका थरथर कापत होत्या. त्यात मी देखील होते; पण विचार करायला अधिक वेळ नव्हता. म्हणून मी पुढे गेले आणि तिचे बाळंतपण केले...’ सावनेरच्या नगर परिषद हायस्कूलमध्ये दहावीत शिकणारी राजनंदिनी दहेरिया सांगत होती. मंगळवारी सकाळी अचानक प्रसूती झालेल्या आणि विचित्र परिस्थितीचा सामना कराव्या लागणाऱ्या महिलेच्या मदतीसाठी तिला कसे जावे लागले, हे ऐकताना अंगावर शहारे येत होते.
ती म्हणाली, आपण तिला बाळाला बाहेर ढकलण्यात मदत केली, तर मोठ्या स्त्रिया बघत उभ्या होत्या. आपण हिंमत एकवटून कशी तरी रेझरने नाळ कापली, रक्तस्राव तात्पुरता थांबवण्यासाठी तिला गाठ बांधायला मदत केली, बाळ बाहेर आल्यावर त्याला स्वच्छ पुसले आणि दोघांना हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर ती पहिल्या सेमिस्टर परीक्षेचा पेपर लिहायला शाळेत गेली. सकाळचा तो अनुभव सांगतानाही थरथरत होती.
झोपडपट्टी भागात राहणारी ती महिला अत्यंत गरीब असून तिचा नवरा कामानिमित्त नागपुरात राहतो. तिला आधीच पाच मुली आहेत. राजनंदिनी घरी परीक्षेची तयारी करत असताना महिलेची मोठी मुलगी मदतीसाठी धावत आली. राजनंदिनीची आई घरी नव्हती. त्यामुळे ती स्वतः मदतीला धावली.
त्या महिलेकडे पैसे नसल्याने बाळंतपणानंतरही ते रुग्णालयात दाखल करण्यास तयार नव्हते. मुलीने जाऊन तिच्या मोठ्या भावाकडून पैसे घेतले आणि महिलेला दाखल करून घेतले. ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरांना हे कळले तेव्हा राजनंदिनीच्या धाडसाचे साऱ्यांनी कौतुक केले.
- राजनंदिनीचे शाळेत झाले कौतुक
राजनंदिनी लहान असतानाच तिचे वडील गमावले. तिच्या आईने तिला आणि मोठ्या भावाचे संगोपन केले. हे काम खूप नाजूक आणि धोकादायक होते. ते केले म्हणून आई रागावली नाही का? असे विचारल्यावर ती म्हणाली, नाही. उलट तिला माझा अभिमान आहे. काहीही असले तरी नेहमी इतरांना मदत करण्यास आईने शिकवले, तिची शिकवण आज कामी आल्याचे ती म्हणाली.
राजनंदिनीने केलेल्या या अचाट साहसाची माहिती शाळेपर्यंत पोहोचल्यावर बुधवारी सकाळी तिचे शाळेत कौतुक झाले. शिक्षकांनी पेन, चॉकलेट्स आणि फुले देऊन तिचा सत्कारही केला.