नागपूर : वासनेची बळी ठरलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने यू ट्यूब पाहून स्वत:ची प्रसूती केल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉक्टरांच्या सूचनेवरून या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. अंबाझरी पोलिसांनी कथित प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पीडित १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी नववीत शिकते. विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार, तिची वर्षभरापूर्वी ठाकूर नावाच्या युवकाशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. ठाकूरने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे ती गर्भवती झाली. विद्यार्थिनीने ही बाब कोणालाही सांगितली नाही. ती आपल्या आईसोबत राहते. तिची आई मॉलमध्ये काम करते. विद्यार्थिनीच्या शरीरात बदल झाल्याचे पाहून घर मालकिणीने अल्पवयीन मुलीच्या आईला विचारपूस केली होती. परंतु, तिच्या आईने प्रतिसाद दिला नाही.
३ फेब्रुवारीला सकाळी आई ड्युटीवर गेल्यावर अल्पवयीन मुलीने यु ट्युब पाहून स्वत:च घरी प्रसूती केली. नवजात बाळाचा रडण्याचा आवाज आल्यास घर मालक आणि शेजाऱ्यांना माहिती होईल या भीतीने तिने नवजात बाळाचा गळा दाबला. नवजात बाळाचा मृतदेह तिने सज्जावर ठेवला. सायंकाळी सहा वाजता तिची आई घरी आल्यावर तिला खोलीत रक्त सांडल्याचे दिसले. आईने विचारले असता तिने मासिक पाळी आल्याचे सांगितले. परंतु, तिच्या आईला ते पटले नाही. तिने घर मालकिणीला घरी बोलावले. त्यानंतर मुलीला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर अल्पवयीन मुलीने स्वत: प्रसूती केल्याचे सांगितले.
डॉक्टरांनी अंबाझरी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी चौकशी केली असता अल्पवयीन मुलीने आपल्या कृत्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी नवजात बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठविला. त्याचा अहवाल यायचा असल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. स्वत:च प्रसूती केल्यामुळे अल्पवयीन मुलीची प्रकृती बिघडली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची चौकशी केल्यानंतर खरी स्थिती कळू शकणार आहे.
दारू पाजून केले शारीरिक संबंध
अल्पवयीन विद्यार्थिनीच्या सांगण्यानुसार कथित ठाकूर याने नऊ महिन्यांपूर्वी तिला सिव्हिल लाईन्समध्ये बोलावले. तेथे एका मित्राच्या खोलीवर नेले. तेथे तिला दारू पाजून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अल्पवयीन ठाकूर आणि त्याच्या मित्राची माहिती नसून, त्यांचा मोबाइल क्रमांकही नसल्याचे सांगत आहे. ज्या इन्स्टाग्राम आयडीवर तिची ठाकूरशी ओळख झाली, ती आयडी या मोबाइलमध्ये होती. आता ती आयडीही तिच्याकडे नाही. अशा स्थितीत पोलिसांना ठाकूर आणि त्याच्याशी निगडित सत्यस्थिती जाणून घेण्यात अडचण येत आहे.