नागपूर : नागपुरात एक शाळकरी विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शाळा व्यवस्थापनकडून याबाबत माहिती देण्यात आली असून ही शाळा एक आठवडा बंद राहणार आहे.
कोरोना संक्रमणाचा धोका कमी झाल्याने मनपा क्षेत्रातील प्राथमिक शाळा नुकत्याच सुरू झाल्या. विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही खुशीचे वातावरण होते. अशातच, आज शहरातील कामटी रोड परिसरातील दिल्ली पब्लिक स्कूलच्या एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. शाळेच्या व्यवस्थापनकडून एका पत्राद्वारे याबाबत माहिती देण्यात आली असून १७ डिसेंबरपासून एक आठवडा ही शाळा बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, एक आठवडा ऑनलाइन क्लासेस सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. शाळा व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. सोबतच विद्यार्थ्याच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करून खबरदारी बाळगण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.