नागपूर : महामेट्रोच्या नोकर भरतीत सर्व नियमांना डावलून थेट मुलाखत घेण्यात आल्या असून, या भरतीत १५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
प्रशांत पवार म्हणाले, महामेट्रोत ओबीसी, एससी, एसटी, महिला, अपंग यांचे आरक्षण नाकारण्यात आले आहे. सरकारी उपक्रमासाठी ठरवून दिलेली नोकर भरतीची प्रक्रिया न करता, चेहरे पाहून भरती करण्यात आली. नोकर भरती करताना परीक्षा, मुलाखत, ग्रुप डिस्कशन, मेडिकल टेस्ट व गेट परीक्षा आदी निकष असतात. परंतु महामेट्रोने फक्त मुलाखत घेऊन भरती केल्यामुळे अकार्यक्षम व्यक्तींना नोकरी मिळाली. सरकारी उपक्रमात नोकरीची जाहिरात करणे आवश्यक असताना, महामेट्रोने कोणतीही जाहिरात केली नाही. जवळच्या लोकांना व नातेवाईकांना नोकरीत सामावून घेतले. यावर काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतला. परंतु ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गाचे काही नेते चुप्पी साधून असल्याचे त्यांनी सांगितले. महामेट्रोने महिला, अपंगांना आरक्षण नाकारल्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. केंद्र शासनाचे नोकर भरतीचे निकष न पाळता भरती केल्यामुळे महामेट्रोतील सर्व नियुक्त्या अवैध आहेत. त्यामुळे पुन्हा नोकर भरती जाहीर करावी, नोकर भरतीत १५० कोटींचा भुर्दंड महामेट्रोला बसल्यामुळे मेट्रो प्रशासन व नोकर भरती करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, अशी मागणी पवार यांनी केली. पत्रकार परिषदेला जय जवान जय किसानचे सचिव अरुण वनकर, विजयकुमार शिंदे, टी. एच. नायडू, मिलिंद महादेवकर, राींद्र इटकेलवार उपस्थित होते.