कामठी : पाेलिसांनी शहरातील भाजीमंडी परिसरात केलेल्या कारवाईमध्ये गुरांच्या मांसाची वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. यात वाहनचालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी (दि. १६) रात्री करण्यात आली.
कामठी (जुनी) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना भाजीमंडी परिसरातील नसीम कुरेशी यांच्या घराजवळ एमएच-०३/सीपी-८९६९ क्रमांकाचे छाेटे मालवाहू वाहन उभे दिसले. त्यात काहीतरी भरले जात असल्याची शंका आल्याने पाेलिसांनी त्या वाहनाला घेराव करीत झडती घेतली. चाैकशीअंती त्यात गुरांचे मांस वाहून नेण्यासाठी भरले जात असल्याचे आढळून आले.
ही बाब बेकायदेशीर असल्याने पाेलिसांनी सलमान खान (२८, रा. भाजीमंडी, कामठी) याला ताब्यात घेत अटक केली. शिवाय, त्याच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन आणि १८ हजार रुपयांचे मांस असा एकूण १ लाख ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार राहुल शिरे यांनी दिली. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र पाटील, अरुण कंगाले, कुश ठाकूर, सुशील यांच्या पथकाने केली.