मोरेश्वर मानापुरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा सर्व सण कोरोना महामारीत गेले आहेत. पुढे येणारे नवरात्र, दसरा आणि दिवाळी सणावरही कोरोनाचे संकट दिसून येत आहे. कोरोनामुळे यंदा उन्हाळ्यात लग्नसराई आणि अन्य सणात गारमेंटची विक्री न झाल्याने नागपुरातील गारमेंट उद्योगाला जवळपास १५०० कोटींचा फटका सहन करावा लागल्याची माहिती आहे.गारमेंट उद्योगासाठी नागपूर ही विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशासाठी मोठी व मुख्य बाजारपेठ आहे. नागपुरात तयार झालेली शेरवानी, कुर्ता-पायजामा, टी-शर्ट, पॅन्ट, जीन्स आदींची होलसेल आणि किरकोळ भावात सर्वत्र विक्री होते. नागपुरात एक हजाराच्या आसपास लहानमोठे उत्पादक आहेत. त्यांच्याकडे अजनूही तयार गारमेंट आणि गारमेंट तयार करण्यासाठी खरेदी केलेला कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल पडून आहे.गारमेंट क्लस्टरचे प्रमुख विपुल पंचमतिया म्हणाले, नागपुरातील उत्पादक फिनिश मालासाठी संपूर्ण देशातून कच्च्या मालाची खरेदी करतात. उन्हाळ्यात लग्नसराई आणि शालेय पोषाखांसाठी उत्पादकांनी जानेवारीपासूनच कच्च्या मालाची खरेदी केली आणि गारमेंट तयार करण्यास सुरुवात केली. पण २० मार्चपासून राज्यात आणि २५ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू झाले आणि राज्य व केंद्र शासनाने उत्पादकांवर अनेक बंधने लादली. याशिवाय लग्नसराईवर बंधने आणून केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्न करण्यास परवानगी दिली. त्यामुळे लग्नसराईत लग्नापूर्वी आणि लग्नानंतरच्या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या परिधानाची खरेदी केली जाते.
पण यंदा ग्राहकांकडून खरेदी झाली नाही. मालाची विक्री न झाल्याने यावर्षी उत्पादकांना लग्नसराईच्या ७०० ते ८०० कोटी रुपयांच्या व्यवसायावर पाणी सोडावे लागले. याशिवाय ईद, गणेशोत्सव, महालक्ष्मी या सणांवरही कोरोनाचे संकट आले. त्यामुळे लोकांनी नवीन कपड्यांची खरेदीच केली नाही. आता आॅक्टोबरमध्ये येणारे नवरात्र, दसरा आणि नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या दिवाळी सणावरही कोरोना महामारीचे संकट उभे राहिले आहे. विक्री होणार वा नाही, या संभ्रमात उत्पादक असल्याने त्यांनी गारमेंटची निर्मिती अजूनही सुरू केलेली नाही.उत्पादकांनी सांगितले, कोरोनामुळे लोकांमध्ये फारसा उत्साह नसल्याने यंदा दसरा आणि दिवाळी सण साजरे होणार नाहीत आणि गारमेंटची विक्री होणार नाही, अशी भीती उत्पादकांमध्ये आहे. यंदाच्या सणात थोडीफार नवीन आणि जुन्या गारमेंटची विक्री होणार आहे. त्यामुळे उत्पादक कच्चा माल खरेदी करून फिनिश माल तयार करण्याची कुणाचीही मानसिकता नाही. कच्चा माल खरेदी केल्यास व्यापाऱ्यांचे पैसे आणि बँकांचे कर्ज व्याजासह परत करावे लागते. माल विकला नाही आणि तो पडून राहिल्यास उत्पादकांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. उत्पादकांच्या बैठकीत प्रत्येकाने स्वत:च्या जबाबदारीवर कच्चा माल खरेदी करून फिनिश माल तयार करावा, असे ठरले आहे. त्यामुळे कुणीही जोखीम घेण्यास तयार नाहीत. पुढील वर्षी बघू, असे उत्तर काही उत्पादकांनी दिल्याची माहिती आहे.
विक्रेते म्हणाले, बाजारात नवीन कपडे खरेदीसाठी कुणीही येत नाही. आवश्यक तेवढीच खरेदी लोकांकडून होत आहे. त्यामुळे विक्रेतेही नवीन गारमेंट दुकानात ठेवण्यास इच्छुक नाहीत. जुन्या मालाच्या विक्रीसाठी काहींनी सेलचे आयोजन केले. पण यंदा हवा तसा प्रतिसाद ग्राहकांकडून मिळालेला नाही. त्यामुळे व्यापारी निराश आहेत. सध्या व्यवसाय ना तोटा ना नफा, या तत्त्वावर सुरू आहे. पुढे परिस्थिती पाहून विक्रेते दुकानात गारमेंटचा भरणा करतील, असे काही विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.