नागपूर: माल वाहतुकीतून दरदिवशी लाखो-करोडोंचा लाभ होत असल्याचे ध्यानात आल्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने अधिकाधिक वॅगन्सच्या देखभाल, दुरूस्ती आणि वापरावर भर दिला आहे. यामुळे यावर्षीच्या सुरूवातीच्या अवघ्या एका महिन्यात रेल्वेला माल वाहतूकीतून चक्क १०० कोटींचा अतिरिक्त फायदा झाला आहे.
अलिकडे काही महिन्यांपासून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात माल वाहतुकीमध्ये मोठी वाढ झाली आहे. साखरेपासून, सिमेंट, कोळशापर्यंत आणि मोठमोठ्या वाहनांना वाहून नेण्यासाठी संबंधित प्रशासन रेल्वेच्या मालवाहतूक विभागाकडे धाव घेत आहे. असे असले तरी ही सर्व वाहतूक करण्यासाठी प्रत्येक वॅगन सुस्थितीत असणे आवश्यक आहे. वॅगन थोडी जरी डॅमेज दिसली, कसलीही त्रुटी दिसली तर वॅगन चांगली नाही, असा शेरा मारून लोडिंग साईडवर ती नाकारली जाते. ते ध्यानात घेऊन नागपूर विभागाने वॅगन दुरुस्ती आणि देखभालीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे ज्या वॅगन्समध्ये दोष काढून त्या अनलोड करण्यास योग्य नसल्याचा शेरा मारण्यात आला होता, त्यातील बहुतांश वॅगनची दुरूस्ती करून दोष दूर करण्यात आले आणि अशा १५, १३९ वॅगनच्या माध्यमातून जानेवारी २०२४ या एका महिन्यात मध्य रेल्वेला नागपूर विभागाने १००.६१ कोटींचा अतिरिक्त महसुल मिळवून दिला.
१० महिन्यात ७८१.५६ कोटीरेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेच्या लोडिंग विभागाने १,२२,५१५ वॅगन वापरासाठी अयोग्य असल्याचे नोंदवले होते. त्यातील १,१७,५९६ वॅगनची दुरूस्ती करून या कालावधीत ७८१.५६ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसुल मिळवला आहे. सरासरी एका वॅगनचे भाडे ६६,४६० रुपये एवढे आकारले जाते.