नागपूर : नासुप्रच्या मालकीची जमीन आपली असल्याचे भासवून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला १.५२ कोटींना गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. सक्करदरा पोलिसांनी यातील सूत्रधार नासुप्रच्या निलंबित कर्मचाऱ्यास अटक केली असून त्याचे दोन साथीदार अद्यापही फरार आहेत.
अनिल अजाबराव ठाकरे (वय ५५, रा. जुना सुभेदार ले आऊट) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे फरार असलेले साथीदार मुख्तार आलम मो. अली (रा. ओम साईनाथनगर) आणि नाझीम अली सय्यद अली (रा. आशीर्वादनगर) यांचा पोलिस शोध घेत आहेत. फसवणुकीचा सूत्रधार अनिल ठाकरे हा वादग्रस्त व्यक्ती आहे. तो एनआयटीत स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (सीईए) पदावर कार्यरत होता. नोकरीवर असताना त्याने अनेकदा घोटाळे केले आहेत. त्यामुळे आतापर्यंत त्याला तीन वेळा निलंबित करण्यात आले आहे. आठ वर्षांपूर्वी तो अखेरच्या वेळी निलंबित झाला होता. तो स्व:तला नासुप्रचा अधिकारी असल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक करतो.
गजानन आनंदराव देवळीकर (वय ७०, रा. महिला आश्रम समोर, स्नेहनगर, सेवाग्राम रोड वर्धा) हे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. ठाकरे याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने त्यांना फसविले. त्याने आपण नासुप्रचा अधिकारी असल्याचे सांगितले. ठाकरे आणि त्याच्या साथीदारांनी देवळीकर यांना उमरेड मार्गावर जाफरी हॉस्पिटलजवळ नासुप्रचा ६ हजार चौरस फुटांचा प्लॉट असल्याचे सांगितले. हा प्लॉट आपल्या नावावर असून त्याने हा प्लॉट विकण्याची इच्छा व्यक्त केली. ठाकरे याने आपल्या नावाने तयार केलेली बनावट कागदपत्रे देवळीकर यांना दाखवून त्यांना विश्वासात घेतले. ठाकरेवर विश्वास ठेवून देवळीकर प्लॉट खरेदी करण्यास तयार झाले. त्यांनी डिसेंबर २०१८ पासून आतापर्यंत ठाकरे आणि त्यांच्या साथीदारांना १.५२ कोटी रुपये दिले. त्यानंतर प्लॉटची रजिस्ट्री करून देण्याची वाट पाहिली. रजिस्ट्रीसाठी अनेकदा बोलूनही ठाकरेने टाळाटाळ केल्यामुळे देवळीकर यांना शंका आली. देवळीकर यांनी माहिती घेतली असता ठाकरे आधीपासून फसवणुकीच्या घटनात सक्रिय असल्याचे त्यांना समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देवळीकर यांनी सक्करदरा ठाण्यात तक्रार दिली. सक्करदरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून ठाकरेला अटक केली आहे. त्याचे दोन साथीदार अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
नासुप्रच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही हात
ठाकरेच्या रॅकेटमध्ये नासुप्रच्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. ठाकरेच्या इशाऱ्यावर ते नागरिकांना बनावट नोटीस पाठवून कारवाईची धमकी देतात. कारवाई टाळण्यासाठी ते नागरिकांकडून वसुली करतात. अशा घटनांमुळे नासुप्रच्या काही कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे.
..........