लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बँक ऑफ महाराष्ट्रने सव्वापाच लाखांहून अधिक व्यक्तींना मुद्रा योजनेंतर्गत कर्जवाटप केले. मात्र, त्यातील तब्बल १५२ कोटींहून अधिकचे कर्ज अनुत्पादित भांडवलात म्हणजेच एनपीएत (नॉन परफॉर्मिंग असेट्स) गेले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत बँक ऑफ महाराष्ट्रकडे विचारणा केली होती. मागील आर्थिक वर्षात बँकेत किती घोटाळे झाले, किती जणांना मुद्रा योजनेत कर्ज देण्यात आले व किती कर्ज एनपीएत गेले, किती रकमेवर कुणीही दावा केलेला नाही व बँकेची एकूण किती रक्कम एनपीएत गेली, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार बँक ऑफ महाराष्ट्रने मुद्रा योजनेंतर्गत ५ लाख ३९ हजार ३३१ लोकांना २ हजार ५६० कोटींचे कर्ज दिले. यातील १२ हजार १७२ कर्जदारांनी कर्जाची परतफेडच केली नाही व १५२ कोटी ३६ लाख रुपये एनपीएत गेले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या एनपीएत गेलेली एकूण रक्कम २ हजार १३७ कोटी इतकी आहे.
आरबीआयकडे ८२५ तक्रारी
विविध त्रुटींबाबत बँक ऑफ महाराष्ट्रकडे ३ हजार ७६० ग्राहकांच्या तक्रारी आल्या, तर रिझर्व्ह बँकेकडे ८२५ तक्रारी झाल्या. बँकेतील ३७३ कोटी ६४ लाख रुपयांच्या रकमेवर कुणीही दावा केलेला नाही.
कोरोनामुळे ३९ जणांचा मृत्यू
मागील आर्थिक वर्षात बँक ऑफ महाराष्ट्रच्या ३९ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ६९८ अधिकारी व कर्मचारी निवृत्त झाले, तर विविध कारणांसाठी १४ जणांना काढून टाकण्यात आले.