लोकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : पाेलिसांनी बुधवारी (दि. २८) सायंकाळी ६.२० वाजताच्या सुमारास कारवाई करीत प्रतिबंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणारा कंटेनर नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील शनी मंदिर परिसरात पकडला. यात दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १५ लाख ३६ हजार रुपयांचा तंबाखू व कंटेनर असा एकूण ३५ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सैकुल शहीद खान (२०) व तालीम खुर्शिद खान (२०) दाेघेही रा. जोतपापडा, ता. पहाडी, जिल्हा भरतपूर (राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. बुटीबाेरी परिसरातून चंद्रपूरच्या दिशेने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय मार्गावरील शनी मंदिर परिसरात नाकाबंदी केली.
यात त्यांनी चंद्रपूरच्या दिशेने जाणारा एचआर-५५/एजी-३३९३ क्रमांकाचा कंटेनर थांबावून झडती घेतली. त्यात पाेलिसांना प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचे बाॅक्स आढळून आले. ती तंबाखूची अवैध वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी कंटेनरमधील दाेघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १५ लाख ३६ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू आणि २० लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण ३५ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे यांनी दिली.
याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, हवालदार सुरेश धवराळ, मिलिंद नांदूरकर, संजय बांते, राजू कापसे, राकेश तालेवार, सत्येंद्र रंगारी, विवेक गेडाम, संजय वैद्य यांच्या पथकाने केली.
...
दिल्ली कनेक्शन
राज्य शासनाने सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र, शेजारच्या मध्य प्रदेशातून नागपूर व शेजारच्या जिल्ह्यात सुगंधित तंबाखू आणला जात असून, त्याचा माेठ्या प्रमाणात वापर व विक्री केली जात आहे. बुटीबाेरी पाेलिसांनी जप्त केलेला तंबाखू हा दिल्ली येथून आणल्याची माहिती ठाणेदार ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली असून, हा तंबाखू चंद्रपूर जिल्ह्यात विक्रीसाठी नेला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
300721\img_20210730_173415.jpg
सुगंधित तंबाकूच्या तस्करी करणाऱ्या आरोपी सह बुटीबोरी पोलीस पथक