नागपूर : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी वेस्टर्न कोल्ड फील्डस लिमिटेड (वेकोलि)ने सामाजिक दायित्वातून नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), ऑल इंडिया मेडिकल सायन्स एम्स आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांट उभारणी वैद्यकीय उपकरणांसाठी एकूण १५ कोटी ३८ लाख रुपयांची मदत केली आहे.
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी वेकोलिचे अध्यक्ष सहप्रबंध व्यवस्थापक मनोज कुमार, संचालक (कार्मिक) डॉ. संजय कुमार, संचालक (वित्त) आर. पी. शुक्ला, सामाजिक दायित्व विभागाचे विभागप्रमुख ए. के. सिंह उपस्थित होते.
यापूर्वी वेकोलिकडून जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांच्याकडे २ कोटी ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. तसेच वणी आणि चंद्रपूर क्षेत्राचे महाव्यवस्थापक उदय कावळे आणि बी. रामाराव यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे नुकताच साडेतीन कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. वेकोलिने सामाजिक दायित्वाच्या निधीतून केलेल्या मदतीमुळे नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यास मदत होणार आहे.