नागपूर : भांडेवाडी डम्पिंग यार्डचे नाव येताच येथे पसरलेली कचऱ्याची ढिगारे आणि दुर्गंधी असलेला परिसर डाेक्यात येताे; मात्र हा परिसर आता हिरवळीसाठीही ओळखला जाईल. या परिसरात जानेवारी २०२० पासून मियावाकी पद्धतीने वृक्षाराेपणाची सुरुवात करण्यात आली. आज या परिसरात ४० प्रजातींची १५५०० झाडे लावण्यात आली आहेत. ५०० मीटर लांब व १० मीटर रुंद परिक्षेत्रात ही झाडे लावण्यात आली आहेत. झाडांना पाणी देण्यासाठी विहीर आणि बाेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच ओसाड वाटणाऱ्या या परिसरात आज हिरवळ दाटली आहे. परिसरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी हे अतिशय लाभदायक ठरणार आहे.
महापालिकेची जैवविविधता समितीच्या अध्यक्ष दिव्या धुरडे यांनी शुक्रवारी भांडेवाडी परिसरात झालेल्या बदलाबाबत माहिती दिली. त्यांनी मनपाच्या उद्यान विभागाच्या उपक्रमाचे काैतुक केले. या उपक्रमामुळे परिसराचा चेहरामाेहरा बदलेल, वातावरणात ऑक्सिजनची मात्रा वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डम्पिंग यार्ड, जुना बुचडखाना, सिंबायाेसिस काॅलेजच्या सुरक्षा भिंतीला लागून मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यात आली. दिव्या धुरडे यांनीही याप्रसंगी एक झाड लावले. यावेळी नगरसेविका आशा उईके, उपायुक्त (उद्यान) अमोल चौरपागर, जैविक विविधता समिती सदस्य दिलीप चिंचमलातपुरे, विजय घुगे, अनसूया काळे, प्राची माहुरकर, कॉलेज ऑफ फिशरी सायन्सचे सहायक प्राध्यापक डॉ. जे. जी. के. पठान, पशुसंवर्धन विभागाचे आकाश बन्सोड, उद्यान निरिक्षक अनंत नागमोते आदी उपस्थित हाेते.
काय आहे मियावाकी पद्धत
ओसाड जमिनीवर हिरवळ फुलविण्यासाठी मियावाकी पद्धतीचा उपयाेग केला जाताे. ज्या जमिनीवर झाडे लावायची आहेत, त्यामध्ये निर्धारित भागात ३-३ फुटाचे खाेल खड्डे खाेदले जातात. यामध्ये जैविक खत मिसळले जाते. नंतर जैवखत मिश्रीत माती जमिनीत टाकून समतल केले जाते. काही दिवस त्यात पाणी टाकले जाते. जमीन सुपिक व्हायला लागताच त्यामध्ये वृक्षाराेपण केले जाते. कमी पाण्याची गरज असलेले मिश्रीत प्रजातीच्या झाडांची येथे लागवड केली जाते.