नागपूर : मोठा ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे माजी अध्यक्ष व काँग्रेस नेते शेख हुसेन अब्दुल जब्बार आणि सचिव इक्बाल वेलजी यांनी १.५९ कोटींचा घोटाळा केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ट्रस्टचे विद्यमान सचिव ताज अहमद यांच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे ताजबाग ट्रस्टशी संबंधित लोकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
उमरेड मार्गावर असलेला प्रसिद्ध ताजबाग दर्गा ट्रस्टद्वारे चालवला जातो. त्याचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती धर्मादाय आयुक्त आणि न्यायालयाच्या दिशानिर्देशांनुसार होते. जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत काँग्रेस नेते शेख हुसेन हे ट्रस्टचे अध्यक्ष, तर इक्बाल वेलजी सचिव होते. विद्यमान सचिव ताज अहमद अली अहमद सय्यद यांच्या तक्रारीनुसार शेख हुसेन आणि इक्बाल वेलजी यांनी हा घोटाळा केला. ट्रस्टला श्रद्धाळू आणि विविध स्रोतांकडून उत्पन्न मिळाले. हुसैन यांनी यापैकी १ कोटी ४८ लाख ३७९ रुपये, तर वेलजीने ११ लाख ५२ हजार २६० रुपये स्वत:च्या खात्यात जमा केले. ही रक्कम जमा करण्यापूर्वी ट्रस्ट किंवा धर्मादाय आयुक्तांची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही.
ट्रस्टमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपासूनच हे प्रकरण तापले होते. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी शेख हुसेन आणि इक्बाल वेलजी यांना चौकशीसाठी बोलावले. सकारात्मक उत्तर न मिळाल्याने पोलीसही चिंतेत होते. बुधवारी रात्री उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ताजबाग परिसराला हजेरी लावल्याचे सांगण्यात येते. गुरुवारी सक्करदरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सध्या पोलिसांनी कुणालाही ताब्यात घेतले नसून, चौकशीनंतर पुढील पावले उचलण्यात येणार आहेत.