लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : अवैध कत्तलखान्यात कत्तलीसाठी आणलेल्या १६ जनावरांची सुटका करीत पाेलिसांनी त्यांना जीवदान दिले. कामठी शहरातील दरगाह मशीद परिसरात केलेल्या कारवाईत २ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईदरम्यान आराेपी तेथून पसार झाला. ही कारवाई मंगळवारी (दि.६) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
शहरातील दरगाह मशीद परिसरात एका घरी कत्तल करण्यासाठी आणलेली १६ जनावरे बांधून असल्याची गुप्त सूचना जुनी कामठी पाेलिसांना मिळाली. त्याआधारे पाेलिसांनी तेथे धाड टाकली. पाेलिसांना पाहून आराेपी टिपू मुल्ला हा तेथून पसार झाला. आराेपीच्या राहत्या घरी पहिल्या माळ्यावर असलेल्या १६ जनावरांची पाेलिसांनी सुटका केली. सर्व जनावरे नवीन कामठीतील गाेरक्षण केंद्रात पाठविली. याप्रकरणी जुनी कामठी पाेलिसांनी आराेपी टिपू मुल्ला याच्याविरुद्ध कलम ११(१)(ड) प्राण्यांना निर्दयतेने वागणूक कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा पाेलीस शाेध घेत आहेत. ठाणेदार राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक युनूस शेख, पाेलीस उपनिरीक्षक नितीन मदनकर, राजू बागडी, महेश कठाणे, कलीम शेख, येतेशाम रिशदी, दीप्ती मोटघरे, स्वाती चेटोले यांच्या पथकाने केली.