नागपूर: नागपूर लोकसभा मतदार संघातून मंगळवारी तबब्ल ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे नागपूरमधून उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्यांची संख्या १६ वर पोहोचली आहे. तर रामटेकमधून मंगळवारी ६ जणांनी उमेदवारी अर्ज सादर केले असून आतापर्यंत ७ उमेदवारांचे अर्ज सादर झाले आहेत. उद्या बुधवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असून उमेदवारांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी ॲड. उल्हास दुपारे (अपक्ष), संतोष चव्हाण (अपक्ष), बबिता अवस्थी (अपक्ष), विनायक अवचट (अपक्ष), श्रीधर साळवे (भीम सेना), सचिन वाघाडे (अपक्ष), ॲड. पंकज शंभरकर (अपक्ष), विशेष फुटाणे (बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी) आणि आदर्श ठाकूर (अपक्ष), किवीनसुका सुर्यवंशी (देश जनहित पार्टी) यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. तर विकास ठाकरे (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपूरसाठी मंगळवारी ७५ अर्जांची तर आतापर्यंत एकूण ३४७ अर्जांची उचल करण्यात आली.
रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सहा अर्ज स्वीकारण्यात आले. रामटेकसाठी एकूण दाखल अर्जांची संख्या ७ झाली आहे. रामटेकसाठी गोवर्धन सोमदेवे (अपक्ष), ॲड. उल्हास दुपारे (अपक्ष), उमेश खडसे (राष्ट्र समर्पण पार्टी), शंकर चहांदे (वंचित बहुजन आघाडी), संदीप गायकवाड (अपक्ष), आशिष सरोदे (भीमसेना) यांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण ७ अर्ज दाखल करण्यात आले रामटेकसाठी मंगळवारी ४२ अर्जांची उचल करण्यात आली. आतापर्यंत रामटेकसाठी एकूण २०५ अर्जांची उचल करण्यात आली.
उद्या बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज सादर करतील. भाजपचे उमेदवार नितीन गडकरी हे सुद्धा उद्याच दिवशी अर्ज सादर करणार आहे. त्यामुळे नेते व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी राहील.
गुरूवारी नामनिर्देशनपत्रांची छाननीनामनिर्देशनपत्रे २७ मार्चपर्यंत सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत सादर करता येतील. २८ मार्च रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. ३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.