लोकमत न्यूज नेटवकं
नागपूर : कोविड काळात महापालिकेचा कर्मचारी जर पॉझिटिव्ह असेल आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्यास त्याच्यासाठी मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात १६ बेड्स राखीव ठेवण्यात आले आहेत. शिवाय कोविड कॉल सेंटरमधून बेड्सच्या उपलब्धतेबाबत संपूर्ण माहिती देण्यात येत आहे.
कोविड काळात मनपा कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा देत होते. अजूनही ते सेवा देत आहेत. मात्र एप्रिल-मे महिन्यात कोरोनाचा प्रकोप सुरू असताना शहरातील कुठल्याही रुग्णालयात बेड उपलब्ध नव्हते. यापुढे मनपा कर्मचाऱ्यांना उपचार मिळावेत, यासाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयात बेड्स आणि इतर सुविधा आरक्षित ठेवण्यात याव्यात, अशी मागणी क्रीडा समितीचे सभापती प्रमोद तभाने यांनी मनपा आयुक्तांकडे केली होती. मनपा कर्मचारी अथवा त्यांचे नातेवाईक पॉझिटिव्ह आल्यास कोरोना नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून बेड उपलब्ध करून देण्यात येत आहे. बेड मिळाले अथवा नाही याची शहानिशाही करण्यात येते, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.