लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी नागपूर विभागात आतापर्यंत १६ लक्ष ४२ हजार १४३ अर्ज प्राप्त झाले आहेत. तालुकास्तरावर अर्जाची छाननी सुरु झाली असून आजपर्यंत १ लाख २ हजार ३८५ अर्जांना तालुका समितीने मान्यता देण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी विभागात नारी शक्ती पोर्टलवर १६ लाख ४२ हजार १४३ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जाची तपासणी तालुका स्तरीय समितीतर्फे सुरु आहेत. तालुकास्तरीय समितीने १ लाखापेक्षा जास्त अर्ज स्विकृत केले असून १४ हजार ५०९ अर्ज अमान्य ठरविले आहे.
जिल्हानिहाय नारी शक्ती ॲपवर प्राप्त झालेलया अर्जामध्ये भंडार जिल्हा २ लाख २हजार ३१८, चंद्रपूर जिल्ह्यात २ लाख ६७ हजार ७८९,गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ४७ हजार २३, गोंदिया जिल्ह्यात २ लाख ७८ हजार ६०४, नागपूर जिल्ह्यात ५ लाख ५२ हजार ९४३, वर्धा जिल्ह्यात १ लाख ९३ हजार ४६६ अर्ज प्राप्त झाले आहेत.
प्राप्त झालेल्या अर्जांची तालुकास्तरीय समिती कडून तपासणी सुरु करण्यात आली आहे. या समितीमध्ये १० सदस्य असून यामध्ये ३ अशासकीय सदस्य आहेत. या समितीचे सदस्य सचिव म्हणून तहसिलदार राहणार आहेत. या समितीकडे योजनेची देखरेख व सनियंत्रण करणे योजनेचा नियमित आढावा घेणे , योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही त्यासोबत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी, तपासणी व अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तालुका समितीनंतर संबंधीत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय समिती असून समितीच्या सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी राहणार आहेत.