नागपूर : ‘सेक्सटॉर्शन’च्या माध्यमातून शहरातील एका वैद्यकीय तज्ज्ञाकडून अज्ञात तरुणीने १६ लाख रुपये उकळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
संबंधित डॉक्टर वरिष्ठ असून जुलै महिन्यात त्यांच्या मोबाईलवर संबंधित तरुणीचा मॅसेज आला. कुतूहलापोटी डॉक्टरने तिच्याशी चॅटिंग करण्यास सुरुवात केली. तिने डॉक्टरला आपल्या जाळ्यात ओढले व अश्लील चॅटिंग सुरू केली. त्यानंतर अश्लील व्हिडिओ कॉल करून त्याचे रेकॉर्डिंग केले. तिने काही दिवसांनी डॉक्टरला १० हजार रुपयांची मागणी केली. डॉक्टरने तिला ते पैसे मदत म्हणून पाठविले. त्यानंतर तिने डॉक्टरला आणखी पैशांची मागणी केली व त्याचे व्हिडिओ-छायाचित्र ‘सोशल मीडिया’त व्हायरल करण्याची धमकी दिली.
डॉक्टरने बदनामीच्या भीतीपोटी ६ लाख रुपये पाठविले. त्यानंतर तिच्या आणखी एका साथीदाराने त्यांना फोन करून पाच लाख रुपयांची मागणी केली. घरी कार्यक्रम असल्याने डॉक्टरने बदनामी नको म्हणून त्यालादेखील पैसे दिले. परंतु दोन दिवसांनी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचा अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत तिसऱ्या व्यक्तीने त्यांना अटकेची भीती दाखविली. दहशतीत आलेल्या डॉक्टरने त्याच्या खात्यातदेखील ५ लाख वळते केले. तीन गुन्हेगारांनी मिळून त्यांच्याकडून सव्वा सोळा लाख रुपये उकळले. अखेर संबंधित डॉक्टरने प्रतापनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दाखल केली. पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
मागील आठवड्यातच मेडिकलमधील एका डॉक्टरकडूनदेखील ‘सेक्सटॉर्शन’च्या माध्यमातून दोन लाख रुपये उकळण्यात आले होते.
सुशिक्षित व्यक्तीभोवती ‘चॅटिंग’चे जाळे
अनेक जण सोशल माध्यमांवर सक्रिय असतात व अनोळखी व्यक्तींशी चॅटिंग करत खासगी माहितीदेखील ‘शेअर’ करतात. भावनेच्या भरात अनेकदा ते अश्लील चॅटिंगकडेदेखील वळतात. हीच बाब धोकादायक ठरते. विशेषत: सुशिक्षित व्यक्ती या जाळ्यात लवकर अडकत असल्याचे चित्र आहे. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या मॅसेजवरील कुठल्याही लिंकला क्लिक करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.