१००० आणि ५०० च्या नोटा : दोघे ताब्यात अन् सुटका नरेश डोंगरे नागपूर चलनातून बाद झालेल्या १६ लाखांच्या नोटा सीताबर्डी पोलिसांनी गुरुवारी दुपारी जप्त केल्या. या चलनासह इनोव्हा कार आणि चलन बाळगणारे दोघे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळताच रात्री उशिरापर्यंत त्यांना सोडवून नेण्यासाठी अनेक घडामोडी घडल्या. पोलीस ठाण्याच्या आवारात अनेकांची गर्दी वाढल्यानंतर उशिरा रात्री रक्कम जप्त करून पोलिसांनी इनोव्हा कार तसेच त्या दोघांना मोकळे केले. सिव्हील लाईनमधील एका बँकेच्या समोर सीताबर्डी पोलिसांना गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार दिसली. संशय आल्यामुळे त्यांनी आतमधील दोघांना विचारपूस केली. त्यांचे वर्तन संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात १००० आणि ५०० च्या चलनातून बाद झालेल्या नोटा आढळल्या. त्या कुठून आणल्या आणि कुठे नेण्यात येत आहे, यासंबंधीची माहिती देण्यासाठी ‘ते‘ दोघे टाळाटाळ करीत असल्याने त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मंजित सिंग आणि जायस्वाल नामक हे दोघे असंबद्ध माहिती देत असतानाच इकडे तिकडे फोन करू लागले. त्यानंतर वाहतूक व्यावसायिक, कपडा व्यापाऱ्यासह अनेक जण सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोहचले. त्या दोघांना पोलीस ठाण्यातून बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत अनेकांचे फोन-ओ-फ्रेण्ड सुरू होते. पोलिसांनी कागदोपत्री कारवाई पूर्ण केल्यानंतर नोटा जप्त करून त्या दोघांना तसेच त्यांच्या ताब्यातील इनोव्हा मध्यरात्री सोडून दिली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्राप्तिकर खात्याचे अधिकारी यांनाही दिली. विशेष म्हणजे, दोन ते तीन हजारांची दारू पकडल्यानंतर फोटोसह बातमी देणाऱ्या पोलिसांनी चलनातून बाद झालेल्या नोटा मुदत संपल्यानंतरही अदलाबदली करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पकडल्यानंतर आणि त्यांच्याकडून एवढे मोठे चलन जप्त केल्यानंतरही त्याची माहिती देण्याचे टाळले. ही गोपनीयता कोणत्या कारणास्तव बाळगली गेली, ते स्पष्ट होऊ शकले नाही.(प्रतिनिधी)
१६ लाखांची चलनबाह्य रोकड जप्त
By admin | Published: March 11, 2017 2:34 AM