नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या १५ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश काढले आहे. यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्याचे जिल्हा परिषदेचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित तालुक्याचे तहसीलदार व पंचायत समितीच्या खंडविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे आता जि.प.ची सदस्यसंख्या ४२ एवढी झाली आहे. ज्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले, ते ओबीसी प्रवर्गातून जानेवारी २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीतून निवडून आले होते. निवडणूक आयोग या १६ जागेवर पुन्हा निवडणूक घेण्याच्या तयारीत असून, निवडणुकीचा स्वतंत्र कार्यक्रम लवकरच देण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
जानेवारी २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता स्थापन केली. या १६ सदस्यांमध्ये काँग्रेसचे ७ सदस्य आहेत. यात उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे आरोग्य व बांधकाम या समितीचे सभापतिपद होते, शिवाय ते काँग्रेस पक्षाचे गटनेतेसुद्धा होते. विरोधी पक्षात असलेल्या भाजपाच्या विरोधी पक्षनेत्यासह ४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्याही गटनेत्यासह ४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. शेकापचे एकमेव सदस्य समीर उमप यांनाही त्याचा फटका बसला आहे. काँग्रेसच्या सदस्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी काही सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
- सदस्यत्व रद्द झालेले राजकीय पक्षाचे सदस्य
-काँग्रेस
मनोहर कुंभारे (केळवद)
ज्योती शिरसकर (वाकोडी)
अर्चना भोयर (करंभाड)
योगेश देशमुख (अरोली)
अवंतिका लेकुरवाळे (वडोदा)
ज्योती राऊत (गोधनी रेल्वे)
कैलास राऊत (बोथिया पालोरा)
- राष्ट्रवादी काँग्रेस
देवका बोडके (सावरगाव)
पूनम जोध (भिष्णूर सर्कल)
चंद्रशेखर कोल्हे (पारडसिंगा)
सुचिता ठाकरे (डिगडोह)
- भाजपा
अनिल निधान (गुमथळा)
राजेंद्र हरडे (नीलडोह)
अर्चना गिरी (डिगडोह-इसासनी)
भोजराज ठवकर (राजोला)
- शेकाप
समीर उमप (येनवा)
- पं.स.च्या तीन सभापतींसह १५ सदस्यांचे सदस्यपद रद्द
जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात ६ पंचायत समितीच्या १५ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यात कळमेश्वर पंचायत समितीचे सभापती श्रावण भिंगारे, रामटेक पंचायत समितीचे सभापती कला ठाकरे, हिंगणा पंचायत समितीचे सभापती बबनराव अव्हाळे यांचा समावेश आहे. अन्य सदस्यांमध्ये कळमेश्वर पं.स.च्या सदस्य मालती वसू, सावनेर पं.स.च्या सदस्य भावना चिखले, ममता मेसरे, गोविंदा ठाकरे, रामटेक पं.स.च्या सदस्य भूमेश्वरी कुंभलकर, भूषण होलगिरे, हिंगणा पंचायत समितीचे सदस्य बबिता आंबेटकर, सुरेश काळबांडे, अंकिता ठाकरे, उमरेड पंचायत समितीतून शालू गिल्लूरकर, सुरेश लेंडे व भिवापूर पंचायत समितीतून नंदा नारनवरे यांचा समावेश आहे.