‘मणप्पुरम गोल्ड’ दरोडा नागपूर : मणप्पुरम गोल्ड फायनान्स लिमिटेड कंपनीच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांचा २४ तासांपेक्षा जास्त कालावधी होऊनही छडा लागलेला नाही. दरम्यान, अशा प्रकारचे दरोडे यापूर्वी कुठे पडले, त्याची माहिती घेत पोलिसांनी दरोडेखोरांबाबत माहिती संकलित केली आहे. दुसरीकडे काही दरोडेखोर छत्तीसगड व मध्य प्रदेशकडे पळाल्याची माहिती मिळाल्यामुळे पोलिसांची वेगवेगळी १६ पथके छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाकडे रवाना झाली आहे. जरीपटक्यातील कुकरेजा कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या माळ्यावर येथील मणप्पुरम फायनान्स लि. मी. चे कार्यालय आहे. बुधवारी दुपारी ४ ते ४.३० च्या सुमारास आत शिरलेल्या दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावर शिपायी संध्या शेंडे यांचे तोंड दाबून त्यांना बंधक बनविले. त्यानंतर नंदकिशोर सुरेशराव नाखले (वय ३०, रा. जयदुर्गा नगर, झिंगाबाई टाकळी) यांच्या गळ्यावर बंदुक लावून त्यांना स्ट्रॉग रूममध्ये नेले. काही दरोडेखोरांनी आतमधील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना पिस्तुलाच्या धाकावर गप्प केले तर, दोघांनी नाखले यांना स्ट्राँग रूममध्ये असलेले लॉकर उघडण्यास भाग पाडले. त्यातील ९ कोटी, ३० लाखांचे दागिने आणि ३ लाख, १ हजार, २०२ रुपयांची रोकड असा एकूण ९ कोटी ३३ लाख, १,२०२ रुपयांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पळून गेले. या प्रकरणी जरीपटका ठाण्यात नाखले यांच्या तक्रारीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती मिळाल्यापासून दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामी लागली आहे. मात्र, २४ तासांपेक्षा जास्त कालावधी झाला असला तरी एकही दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागला नाही. (प्रतिनिधी)
तपासासाठी १६ पथके परप्रांतात
By admin | Published: September 30, 2016 3:15 AM