राजस्थानात नेले : महिनाभरातील दुसरी घटना नागपूर : अजनी पोलीस ठाणे हद्दीतील रामटेकेनगर येथील एका तरुणीला १ लाख ६० हजार रुपयात राजस्थानात विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिना भरातील ही दुसरी घटना समोर आली आहे. १७ वर्षीय तरुणीला पाच महिन्यापूर्वी करोली राजस्थान येथील मुकुट गुर्जर याला विकण्यात आले. पीडित तरुणीची आई तक्रार करायला अजनी पोलीस ठाण्यात गेली असता तिला परत पाठविण्यात आले. निर्भया मुलगी सुरक्षा समितीने गुन्हे शाखेच्या मदतीने विकण्यात आलेल्या मुलीला काही दिवसांपूर्वीच सोडवून आणले. तरुणीच्या आईने समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्या माध्यमातून अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांची एक चमू समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गुरव यांच्यासोबत राजस्थानला पाठविण्यात आली. परंतु आरोपींना याची माहिती होताच तो तरुणीला सोडून पळून गेला. अंजली वानखेडे आणि गुड्डी यादव यांच्यामार्फत तरुणीला विकण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तीन लाखाच्या विक्रीत स्वाती आवटे सुद्धा सहभागी होती. ज्येष्ठ पत्रकार उमेश चौबे यांनी तरुणींच्या विक्रीत सहभागी असलेल्या आरोपीला वाचवले जात असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी खऱ्या आरोपीला अटक न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणात समितीच्या सचिव सविता पांडे, नरेश निमजे, मंगला धोटे, इरफान खान, सुनिता ठाकरे, उत्तम साळुंके, विक्रांत मोहरे, विनोद गुप्ता यांनी मदत केली. (प्रतिनिधी)
१.६० लाखात तरुणीची विक्री
By admin | Published: February 25, 2016 2:52 AM