लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : पाेलिसांच्या पथकाने कवडक-दुधाळा मार्गालगत असलेल्या रामटेक नगरपरिषदेच्या एका क्वाॅर्टरमध्ये धाड टाकली. यात अवैध दारू विक्रेत्याच्या विरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला असून, त्याच्याकडून एकूण १ लाख ६० हजार रुपये किमतीची माेहफुलाची दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (दि. ३) रात्री करण्यात आली.
विजय अहिरकर रा.शिवाजी वॉर्ड, रामटेक असे अवैध दारू विक्रेत्याचे नाव आहे. कवडक-दुधाळा मार्गालगत रामटेक नगरपरिषदेचे क्वाॅर्टर आहेत. यातील क्वाॅर्टर क्रमांक-६० मध्ये माेठ्या प्रमाणात माेहफुलाची दारू साठवून ठेवली आहे, अशी माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांच्या पथकाने गुरुवारी रात्री या भागाची पाहणी करीत त्या क्वाॅर्टरवर धाड टाकली.
यात पाेलिसांनी विजय अहिरकर याच्या विराेधात गुन्हा नाेंदविला असून, त्यांच्याकडून १ लाख ६० हजार रुपये किमतीची माेहफुलाची ८०० लीटर दारू व पाच हजार रुपयांचे दारू साठविण्यासाठी वापरण्यात आलेले रबरी ट्युब व ड्रम असा एकूण १ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार प्रमाेद मक्केश्वर यांनी दिली. या प्रकरणी रामटेक पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे, उपनिरीक्षक प्रमोद राऊत, शिपाई आकाश शिरसाठ, सचिन गेडाम यांच्या पथकाने केली.