नागपूर : घर भाड्याने घेण्याच्या बहाण्याने वृद्धाची १.६० लाखांनी फसवणूक करण्यात आली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अरुण वानखेडे (७३, शिल्पा सोसायटी, मनीषनगर) यांनी त्यांचे घर भाड्याने देण्यासाठी ९९ एकर या ॲपवर जाहिरात दिली होती. त्यांना अनिल हेडाऊ नामक एका व्यक्तीचा २ ऑगस्ट रोजी एसएमएस आला व तो घर भाड्याने घेण्यास इच्छुक असल्याचे त्याने सांगितले. आसाम विमानतळाचा मुख्य सुरक्षा अधिकारी असून नागपूरला बदली झाली असल्याची त्याने बतावणी केली. वानखेडे यांनी २ महिन्यांचा ॲडव्हान्स मागत त्याला घर भाड्याने देण्याची तयारी दाखविली.
आरोपीने वानखेडे यांना ऑनलाईन ४० हजार रुपये पाठवतो असे सांगितले व गुगल पेवर त्याने पाठविलेली माहिती भरण्यास सांगितली. वानखेडे यांनी त्याप्रमाणे प्रक्रिया केली असता त्यांच्या बॅंक खात्यातूनच ४० हजार रुपये वळते झाले. वानखेडे यांनी त्याला हे सांगितले असता त्याने चुकीने असे झाले असल्याचे म्हणत एकूण ८० हजार रुपये लगेच पाठवतो असे म्हटले व परत तीच प्रक्रिया करण्यास सांगितली. दुसऱ्या वेळेस वानखेडे यांचे ४० हजार रुपये परत वळते झाले. तिसऱ्या वेळेस त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी परत तीच प्रक्रिया केली असता ८० हजार रुपये बॅंक खात्यातून कपात झाले. एकूण १ लाख ६० हजार रुपये गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची बाब वानखेडे यांच्या लक्षात आली.
त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली व बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. राजस्थान येथील भरतपूर येथील दीपक शर्मा व राजस्थानमधीलच अलवर येथील सत्यवीर उमराव यांच्या बॅंक खात्यात वानखेडे यांची रक्कम जमा झाल्याची बाब समोर आली. त्यांच्याविरोधातदेखील पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.