लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी मागील काही वर्षात खुल्या मैदानात, उद्यानात ७९ ग्रीम जीम व १६० खुल्या व्यायाम शाळा उभारण्याला मंजुरी दिली होती. व्यायाम शाळांसाठी वर्ष २०१९-२० या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ११.१२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र अद्याप हा निधी अखर्चित असल्याने खुल्या व्यायामशाळा अस्तित्वातच आलेल्या नाही.
जिल्हा वाषिंक योजनेत शहरातील विविध भागात १६० खुल्या व्यायाम शाळा व व्यायामाच्या साहित्यासाठी ११.१२ कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र एकाही मैदानात खुली व्यायाम शाळा सुरू झालेली नाही. तरतूद करूनही हा निधी अखर्चित असल्याने शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढविण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी नियमित व्यायामाची गरज आहे. शहरातील मोकळ्या मैदानात व्यायाम शाळा सुरू झाल्या असत्या तर नागरिकांना व्यायामाची साधने उपलब्ध झाली असती. दुदैवाने हा निधी अखर्चित आहे.
....
ग्रीन जीमची अवस्था बिकट
जिल्हा वाषिर्क योजनेंतर्गत २०१७-१८ या वर्षात शहरातील उद्यानात १५खुले जीम लावण्यात आले. यावर ९०लाखांचा खर्च करण्यात आला. वर्ष २०१८-१९ या वर्षात ग्रीन ६४ ग्रीन जीमसाठी जिल्हा वाषिंक योजनेतून ४.३२ कोटी मिळाले. यातून ग्रीम जीम लावण्यात आले. मात्र मागील काही महिन्यात या ग्रीन जीमची अवस्था बिकट झाली आहे. जीममधी साधने नादुरुस्त झालेली आहेत. त्याची देखभाल होत नसल्याने नागरिकांना याचा लाभ घेता येत नाही. तसेच मनपाने उभारलेल्या १५० जीमची देखभाल नाही.
.......
सर्व ग्रीन जिमची तपासणी करा : झलके
ग्रीन जीम लावल्यानंतर संबंधित कंत्राटदाराकडून त्याच्या व्यवस्थापनाकडे लक्ष दिले जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ग्रीन जीम लावलेल्या ठिकाणी कंत्राटदाराने फलक लावून जीमचे आयुर्मान कालावधी व त्याच्या नियमित होणाऱ्या व्यवस्थापनाची माहिती देणे अनिवार्य आहे. मात्र अनेक ठिकाणी असे फलक लावण्यात आलेले नाही. तसेच अनेक जीमची स्थिती वाईट असल्याने शहरातील सर्व जीमची तपासणी करून तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांनी बुधवारी समितीच्या बैठकीत दिले.