ठळक मुद्देवडिलांनी सुरु केलेले व्रतच आपण पुढे नेत असल्याचे जया वानखेडे यांचे सांगणे आहे. तोच आपल्याला वडिलांचा आशीर्वाद आहे असे त्या मानतात.
वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:पश्चिम- दक्षिण नागपुरातील माटे चौक. हा तसा नेहमीच गजबजलेला चौक. अंबाझरी तलाव, एमआयडीसी, हिंगणा या भागाला उर्वरित नागपूरशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा. या चौकात दररोज सकाळी सात वाजता एक अनोखे दृश्य बघायला मिळते. टू व्हीलरवर एक मध्यम वयाची स्त्री उतरते. तिच्याजवळच्या डब्यातून पोळ्या काढते. त्या एका पसरट स्टीलच्या भांड्यात ठेवते. त्यावर सोबत आणलेले दूध घालते. वरून थोडे पेडिग्री घालते आणि ते भांडे फूटपाथजवळच्या उठता येत नसलेल्या आणि क्षीण आशावत डोळ्यानी तिच्याकडे एकटक पाहणाऱ्या अर्धमेल्या कुत्र्याच्या समोर नेऊन ठेवते. काही मिनिटातच ते कुत्रे त्या अन्नाचा फडशा पाडते. जिभल्या चाटत तृप्त नजरेने तिच्याकडे पाहते. ती शांतपणे उठते. ताटली उचलून पिशवीत घालते आणि रस्त्याच्या पलिकडे असलेल्या पाय तुटलेल्या दुसऱ्या कुत्र्याच्या दिशेने वळते... अशी दिवसभरात सुमारे ४० कुत्र्यांना ती स्त्री जेवू घालते.दररोज दोन वेळच्या एकूण १६० पोळ्या, चार लिटर दूध आणि एक मोठे पाकीट पेडिग्री रस्त्यावरच्या कुत्र्यांना खाऊ घालणे हा उपक्रम, नव्हे.. हे तिचे व्रत गेल्या २० वर्षांपासूनच असेच सुरू असते.. त्यासाठी तिने आजवर कधीही आॅफिसमधून सुटी घेतलेली नसते आणि कुठेही गावाला ती गेलेली नसते. त्या असतात, सौ. जया जयंत वानखेडे. पूर्वाश्रमीच्या जया सुब्रमण्यम.जया वानखेडे यांचे वडील सी.एस. सुब्रमण्यम आणि आई पार्वती हे दांपत्य मुळातूनच श्वानप्रेमी. जया सांगतात, त्या लहान असल्यापासूनच त्यांच्या घरात श्वानांचा वावर असल्याचे त्यांना आठवते. वडिलांना रस्त्यावरून फिरणाऱ्या कुत्र्यांविषयी अतोनात प्रेम होते. एखाद्या पिल्लाला जखमी अवस्थेत पाहिले किंवा भुकेने कळवळून ओरडताना पाहिले की ते त्याला घरीच घेऊन यायचे. त्याचे संगोपन करायचे. तेव्हापासून जया यांच्याही मनात प्राणीप्रेम रुजले.रस्त्यावरच्या कुत्र्यांना पोळ्या खाऊ घालण्याचा वसा केव्हापासून घेतला हे त्यांना नेमके आठवत नाही पण वीस वर्ष झालेत या गोष्टीला असं त्या सांगतात. त्यांच्या सध्याच्या घरातही किमान १० कुत्री राहत आहेत.जया यांचा दिवस ब्रह्ममुहूर्तावर सुरू होते. पहाटेच उठून त्या दररोज ८० च्या जवळपास पोळ्या बनवतात. या पोळ्या कुत्र्यांना खाऊ घालायच्या असल्याने त्या जरा जाड बनवाव्या लागतात. पोळ्या झाल्या की दूध व पोळ्या आपल्या टू व्हीलवरवर ठेवून त्या सकाळी सातच्या सुमारास घरातून निघतात. त्यांची ठिकाणे आता निश्चित झाली आहेत. माटे चौकातील कुत्र्यांना पोळ्या दिल्यावर त्या आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये फिरणाऱ्या कुत्र्यांना पोळ्या देतात. या कुत्र्यांनाही त्यांचे येणे इतके माहित झालेले असते की त्या यायच्या आधीच ती सर्व ठरल्या ठिकाणी हजरच असतात.त्यांचे हे काम साधारण दोन ते अडीच तासात संपते. मग त्या घरी येतात, घरचा स्वयंपाक करून आॅफिसला जातात. संध्याकाळी पाचच्या सुमारास परत घरी येऊन पुन्हा ८० ते ९० पोळ्या बनवतात व संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान नागपुरातील खामला भागात जाऊन तेथील रस्त्यांवर भटकाणाऱ्या कुत्र्यांना पोळ्या व दूध देतात. रात्री नऊ पर्यंत घरी येतात. मग घरातील कुत्र्यांची सरबराई सुरू होते.या कामात कधीही खंड पडलेला नाही. त्यांचे पती जयंत वानखेडे हे या कामात त्यांना सहकार्य करतात. जया एका अर्थाने कुत्र्यांच्या डॉक्टरच झाल्या आहेत. सर्व प्रकारची औषधे त्यांना ठाऊक आहेत. आजारी कुत्र्यांना त्या स्वत:च औषधोपचार करतात. वादळ असो, वारा असो, थंडी असो, आजारपण असो, त्यांचा नेम कधी चुकलेला नाही.