लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : पाेलिसांच्या पथकाने शनिवारी (दि.११) दुपारी नगरधन (ता.रामटेक) येथील किराणा दुकानात धाड टाकत १६ हजार ३९० रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केला. या प्रकरणात दुकानदारास अटक करण्यात आली, अशी माहिती ठाणेदार प्रमाेद मकेश्वर यांनी दिली.
अक्षय शंकर नासरे (२१, रा.नगरधन, ता.रामटेक) याचे नगरधन येथे किराणा दुकान आहे. ताे किराणा दुकानातून राज्य शासनाने बंदी घातलेल्या सुगंधित तंबाखूची विक्री करीत असल्याची माहिती रामटेक पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी या दुकानात बनावट ग्राहक पाठवून तंबाखू खरेदी केला. त्यानंतर, खात्री पटताच धाड टाकून दुकानाची कसून घडती घेतली. यात पाेलिसांना दुकानात तीन वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या तंबाखूची एकूण ६५ पाकिटे आढळून आली. हा सर्व तंबाखू प्रतिबंधित असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी ताे जप्त केला आणि दुकानदार अक्षय नासरे यास अटक केली.
जप्त केलेल्या तंबाखूची एकूण किंमत १६ हजार ३९० रुपये असल्याची, तसेच या तंबाखूच्या साठा, वितरण व विक्रीस महाराष्ट्रात बंदी असल्याची माहिती ठाणेदार प्रमाेद मकेश्वर यांनी दिली. या प्रकरणी रामटेक पाेलिसांनी भादंवि ३२८, २७२, २७३, अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ सहकलम ५९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक प्रमाेद राऊत करीत आहेत.