लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) मंगळवारी टाकलेल्या धाडीत १.६७ लाख रुपये किमतीचा रिफाईन सोयाबीन तेल आणि शेंगदाणा खाद्यतेलाचा साठा जप्त केला. साठ्यातून प्रत्येकी एक-एक नमुना विश्लेषणासाठी घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेला आहे. नमुन्यांचे विश्लेषण प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार आहे.प्राप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी मंगळवारी चंद्रभागा तेल भंडार, आजमशहा ले-आऊट, गणेशनगर, संगम टॉकीज रोड या पेढीवर धाड टाकली. पेढीचे मालक महेश हनुमानप्रसाद जयस्वाल हे रिफाईन सोयाबीन तेल अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करून पुनर्वापर केलेल्या १५ किलो/लिटरच्या टिनमध्ये रिपॅकिंग करून तसेच शेंगदाणा तेलाचे पॅकिंग न करता खुले स्वरुपात विक्री करीत असल्याचे आढळले. भेसळीच्या संशयावरून अधिकाऱ्यांनी ३२,२८६ रुपये किमतीचे ३८८.४ लिटर रिफाईन सोयाबीन तेल (मारुती) आणि १.३५ लाख रुपये किमतीचे ८९८.४ किलो शेंगदाणा तेल (लूज) असा एकूण १.६७ लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला.ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (अन्न) अभय देशपांडे यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी अनंतकुमार चौधरी यांनी केली. सणासुदीच्या दिवसात खाद्य पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता जास्त असल्याने विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. ग्राहकांना अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत तक्रार असल्यास प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन चंद्रकांत पवार यांनी केले आहे.
नागपुरात १.६७ लाखांचा भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 8:43 PM