अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई : मोहीम पुढेही सुरू राहणार नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहिमेंतर्गत १.६९ लाख रुपये किमतीचा कार्बाइडयुक्त आंब्याचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. विभागाने संयुक्त कारवाई २९ एप्रिलला केली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूरचे सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे आणि मोतीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली. अन्न सुरक्षा अधिकारी मनोज तिवारी आणि अखिलेश राऊत यांच्या पथकाने एपीएमसी मार्केट यार्ड, कळमना येथील राजू कटारिया पुत्र रामचंद्र कटारिया यांच्या दुकान क्र. ३५ येथील फर्मची तपासणी करून कार्बाइडयुक्त साठविलेल्या साठ्यातून नमुना घेतल्यानंतर उर्वरित २४० किलो वजनाचे ३६०७ रुपये किमतीचे आंबे जप्त करण्यात आले. तसेच अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण उमप आणि भंडारा कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी भास्कर नंदनवार यांच्या पथकाने एपीएमसी मार्केट याड, कळमना येथील जितेंद्र गणेश मानकर यांच्या हॉल क्र.-२ मधील फर्मची तपासणी केली. कार्बाइडयुक्त साठविलेल्या आंब्याच्या साठ्यातून नमुना घेतल्यानंतर उर्वरित २२७८ किलो वजनाचे ४५,५६० रुपये किमतीचे आंबे जप्त करण्यात आले. याशिवाय अन्न सुरक्षा अधिकारी विनोद धवड यांच्या पथकाने एपीएमसी मार्केट यार्ड, कळमना येथील मोहम्मद इरफान रईन यांच्या प्लॅटफॉर्म क्र.-२ येथील फर्मची तपासणी केली. तपासणीदरम्यान साठविलेल्या साठ्यातून नमुना घेतल्यानंतर उर्वरित २९९८ किलो वजनाचे १.२० लाख रुपये किमतीचे आंबे जप्त करण्यात आले. तसेच अन्न सुरक्षा अधिकारी आनंद महाजन, किरण गेडाम आणि शीतल देशपांडे यांच्या पथकाने कळमना मार्केट यार्डमधील मोहम्मद इसाक हाजी मोहम्मद जावेद फ्रूट, शॉप क्र.५२, गिड्डूमल टोपनदास शॉप क्र.-१७ आणि श्रद्धा फ्रूट ट्रेडर्स या फर्मची तपासणी करून विश्लेषणाकरिता आंब्याचे नमुने घेण्यात आले. जप्त साठा नाशवंत पदार्थ असल्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानके कायदा-२००६ अंतर्गत २९ एप्रिलला मनपाच्या डम्पिंग यार्ड येथे जमिनीत पुरून नष्ट केला. जनआरोग्याचा विचार करता या प्रकारची मोहीम यापुढेही सुरू राहील, असे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कार्बाईडयुक्त आंब्याचा १.६९ लाखांचा साठा जप्त
By admin | Published: May 03, 2017 2:16 AM