नागपूर : वेगाने वाढणाऱ्या काेराेनाच्या संक्रमणामुळे ऑक्सिजन टंचाईचा सामना करीत असलेल्या नागपूर जिल्ह्यासाठी बाहेरून पाेहोचलेल्या १६९ टन ऑक्सिजनमुळे थाेडासा दिलासा मिळाला. शुक्रवारी ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे ही खेप शहरात पाेहोचल्यानंतर मेडिकल काॅलेज आणि मेयाे रुग्णालयाला प्रत्येकी १५ टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. विभागीय आयुक्त डाॅ. संजीव कुमार यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त चव्हाण यांच्यामार्फत हा पुरवठा केला. ऑक्सिजनच्या आयातीमुळे जिल्हाला माेठा दिलासा मिळाला आहे.
उल्लेखनीय म्हणजे ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे जिल्ह्यात ३० मेट्रिक टन ऑक्सिजनची आयात करण्यात आली. यासह निकाे रायपूरवरून ३८ मेट्रिक टन, आयनाॅक्स भिलाईवरून १० मेट्रिक टन आणि राऊरकेला येथून ३८ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाला आहे. याशिवाय चंद्रपूर आणि वर्ध्यावरूनही १५-१५ मेट्रिक टनांची आवक झालेली आहे. जिल्ह्याला प्रचंड ऑक्सिजन टंचाईचा सामना करावा लागत आहे. याच कारणाने रुग्णालयात ऑक्सिजन बेडची संख्या वाढविणे शक्य झाले नाही. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यांमधून आयात करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. आवक वाढल्याने रुग्णालयात ऑक्सिजन बेड वाढविणे शक्य हाेईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.