लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीर्घकाळ वीज बिलाची थकबाकी असलेल्या आणि वारंवार सूचित करूनही ती न भरणाऱ्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील ११ जिल्हे मिळून एकट्या फेब्रुवारी महिन्यात तब्बल १६ हजार ५८९ घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यापैकी काहींचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे.वीज बिलांची थकबाकी असणाऱ्यांचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई महावितरणकडून सातत्याने करण्यात येते. मात्र सध्या आर्थिक वर्षातील शेवटचा महिना असल्याने आणि अनेक महिने वीज बिल न भरलेल्या ग्राहकांची संख्या वाढल्याने महावितरणकडून वसुलीचा धडाका सुरू करण्यात आला आहे. वीज ग्राहकांकडे महावितरणच्या मासिक बिलाचा एक रुपयाही थकीत राहणार नाही, या ध्येयाने या मोहिमेमध्ये सर्वच अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत तर थकबाकीचा भरणा न झाल्यास कोणत्याही स्थितीत थकबाकीदाराचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातील महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील एकूण १ लाख ७६ हजार ९७९ वीज ग्राहकांकडे एकूण ७० कोटी ३१ लाखाची थकबाकी होती, त्यापैकी या विशेष शून्य थकबाकी मोहिमेत १ लाख १ हजार २०९ ग्राहकांकडून २२ कोटी ९१ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे तर १० हजार ४९८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात आणि ६ हजार ९१ थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. यापैकी तब्बल ५ हजार ३४९ ग्राहकांचा वीजपुरवठा मागील आठवड्याभरात खंडित करण्यात आला. यात सर्वाधिक अकोला परिमंडळातील ७ हजार १४८ ग्राहकांचा समावेश असून त्याखालोखाल अमरावतीतील ५,१३७ ग्राहकांचा समावेश आहे, याशिवाय नागपूर परिमंडळातील २,००६, चंद्रपूर परिमंडळातील १, ६४३ तर गोंदियातील ६५५ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यापैकी ३५९३ ग्राहकांनी रीतसर पुनर्जोडणी शुल्क आणि थकबाकीचा भरणा केल्याने त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत जोडण्यात आला आहे. तत्पूर्वी जानेवारी महिन्यातही नागपूर परिक्षेत्रातील तब्बल १६ हजार ७६२ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही अनधिकृतपणे वीज वापर केल्यास थेट फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे
साडेसोळा हजारावर थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 9:23 PM
दीर्घकाळ वीज बिलाची थकबाकी असलेल्या आणि वारंवार सूचित करूनही ती न भरणाऱ्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील ११ जिल्हे मिळून एकट्या फेब्रुवारी महिन्यात तब्बल १६ हजार ५८९ घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यापैकी काहींचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे.
ठळक मुद्देथकबाकी वसुलीसाठी महावितरणचा धडाका : अकराही जिल्ह्यांमध्ये मोहीम