लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - महाठग विजय गुरनुले आणि त्याच्या मेट्रोविजन बिल्डकॉन इंडिया लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या चंद्रपुरातील एका वेकोलि अधिकाऱ्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १.७ कोटी रुपये जप्त करण्यात आले. तुलसीराम नामदेवराव जेंगठे (वय ५७, रा. शिवनगर वाॅर्ड राजुरा) आणि आलोक विनोद मेश्शिराम (वय २८, रा. रामापल्ली, वाराशिवनी, बालाघाट) अशी त्यांची नावे आहेत. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांनी शनिवारी पत्रकारांना ही माहिती दिली. या दोघांच्या अटकेमुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता १५ झाल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात आतापावेतो पोलिसांनी ३ कोटींची रोकड, पाच वाहने, सुमारे २० लाखांचे दागिने २२ एकर जमीन आणि ३ फ्लॅट जप्त केले आहे. एखाद्या प्रकरणात पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्याची ही नागपुरातील पहिलीच कारवाई आहे, हे विशेष ।
आरोपी जेंगठे वेकोलित अधिकारी असून मेश्राम एजंट म्हणून काम करायचा. चंद्रपूर जिल्ह्यातील खाणीत असलेल्या शेकडो गुंतवणूकदारांना गुरनुलेच्या कंपनीत कोट्यवधी रुपये गुंतवायला भाग पाडण्याची भूमिका या दोघांनी वठविली. पोलिसांनी कारवाईचा पाश आवळताच या दोघांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. फरारही झाले मात्र आम्ही त्यांच्या अखेर मुसक्या बांधून त्यांचा २२ डिसेंबरपर्यंत पीसीआर मिळवल्याचेही उपायुक्त हसन यांनी सांगितले.
... अन्यथा कारवाईसाठी तयार रहा
आरोपींच्या जाळ्यात अडकून आपली रक्कम गमविणारांची संख्या १२,५०० वर पोहचली आहेत. त्यातील ७५० जणांनी प्रत्यक्ष तसेच व्हॉटसॲपच्या माध्यमातून तक्रारी दिल्या आहेत. या प्रकरणात आरोपींची संख्या आणखी वाढू शकते, असेही त्यांनी सांगितले. गुरनुलेच्या कंपनीतून ज्यांनी गैरप्रकारे लाभ घेतला. त्यांनी लाभाची रक्कम पोलिसांकडे जमा करावी, अन्यथा कारवाईसाठी तयार रहावे, असा इशाराही त्यांनी पत्रकारांच्या माध्यमातून दिला आहे. यावेळी प्रतापनगरचे ठाणेदार भीमराव खंदाळे उपस्थित होते.