नागपूर : अनोळखी व्यक्तीने दिलेले चाॅकलेट खाल्ल्याने सिताबर्डी येथील मदन गोपाल हायस्कूलमधील १७ मुलांना विषबाधा झाली. या मुलांना उलट्या व मळमळल्यासारखे वाटत होते. आता सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे.
या मुलांना शाळेच्या बाहेर एका अनोळखी व्यक्तीने चाॅकलेट वाटल्याचे समोर आले आहे. चाॅकलेट वाटणारी व्यक्ती नेमकी कोण आहे, याचा शोध सुरू असल्याची माहिती बर्डी पोलिसांनी दिली आहे. कोणी वाढदिवशी चॉकलेट वाटले की काही वेगळा हेतू होता या सर्व बाबी तपासानंतर उघड होईल असे पोलिसांनी सांगितले.
या सर्व मुलांना सिताबर्डी येथीलच एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर ताबडतोब प्रथमोपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे.