लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपसंतीच्या शाळेत बदली मिळण्यासाठी शिक्षकांनी बोगस प्रस्ताव सादर केल्याचे उघडकीस आले आहे. यात १७ शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई विभागाकडून करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या पार पडल्या. या बदल्या चांगल्याच वादग्रस्त ठरत आहे. अनेक शिक्षकांनी आवडत्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी बोगस दस्तावेज सादर करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचे उघडकीस झाले आहे. आजवर अशा १७ शिक्षकांचे बदली प्रस्ताव बोगस असल्याचे निष्पन्न झाले असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर्षी जि.प.च्या २२५० शिक्षकांच्या बदल्या झाल्या. बदली प्रक्रियेत बोगस दस्तावेज सादर करून, शिक्षकांनी लाभ घेतल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून झाला होता. त्यामुळे शिक्षण विभागाने पंचायत समितीस्तरीय चार सदस्यांच्या चौकशी समिती नेमली. या चौकशीत या गुरुजींचे पितळ उघडे पडले व पुढील प्रक्रियेत होणारा खोळंबा शिक्षण विभागाला टाळता आला. अशा शिक्षकांना नोटीस देऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. त्यांची वेतनवाढ रोखण्याचीही शिफारस शिक्षण विभागाने केली आहे. तसेच या शिक्षकांना शिक्षा म्हणून अवघड क्षेत्रात हलविण्याचा प्राथमिक निर्णय आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संवर्ग एक अर्थात विशेष प्रवगार्तील सात शिक्षक असून संवर्ग- दोन म्हणजेच पती-पत्नी एकत्रीकरणामधील १० शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती आहे.संवर्ग एक विशेष प्रवगार्साठी १२९८ शिक्षकांनी आॅनलाईन तर सवंर्ग दोनमधून ३७४ शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज सादर केले होते. ज्या शिक्षकांनी आॅनलाइन अर्ज सादर केले. त्यांच्या योग्य प्रमाणपत्राच्या चौकशीसाठी तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधीक्षक आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची समिती होती. या समितीने सर्व दस्तऐवजाची कसून चौकशी केल्यानंतर १७ शिक्षकांची बोगसगिरी लक्षात आली आहे. पुढे आणखी शिक्षक येणार असल्याने अनेक शिक्षकांच्या हृदयाचे ठोके चांगलेच वाढले आहेत.
बदल्यांसाठी नागपूर जिल्हा परिषदेच्या १७ गुरुजींकडून ‘बोगसगिरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:58 PM
मनपसंतीच्या शाळेत बदली मिळण्यासाठी शिक्षकांनी बोगस प्रस्ताव सादर केल्याचे उघडकीस आले आहे. यात १७ शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई विभागाकडून करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या पार पडल्या. या बदल्या चांगल्याच वादग्रस्त ठरत आहे.
ठळक मुद्देबोगस प्रस्ताव सादर : चौकशी समितीत उघड