कान्हा व्याघ्रप्रकल्पाचे वास्तव नागपूर : व्याघ्रप्रकल्पात वाघांना मुक्तपणे संचार करता यावा यासाठी योग्य ती सुरक्षा पुरविणे अपेक्षित असते. परंतु कान्हा व्याघ्रप्रकल्पात याकडे कुठेतरी त्रुटी राहत असल्याचे दिसून येत आहे. ४ वर्षांत या व्याघ्रप्रकल्पात १७ वाघांची शिकार करण्यात आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात विचारणा केली होती. कान्हा व्याघ्रप्रकल्पात किती वाघ आहेत, किती वाघांचा बळी गेला, पर्यटकांची संख्या किती अशाप्रकारच्या प्रश्नांचा यात समावेश होता. याबद्दल दिलेल्या माहितीनुसार २०१० ते २०१३ या ४ वर्षांत १७ वाघांची शिकार करण्यात आली. २०१३ साली ४ वाघांची शिकार करण्यात आली. वन प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी १९ आरोपींना अटक करण्यात आली. अखेरच्या २ वर्षांत केवळ दोनच आरोपींना अटक झाली आहे. शिवाय या व्याघ्र प्रकल्पात एकूण ६५ विविध जातीचे वृक्ष कापल्याचे आढळून आले. त्यात २०१० मध्ये २५, २०११ मध्ये १७, २०१२ मध्ये १४ आणि २०१३ मध्ये ९ वृक्षांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)पर्यटकांना आकर्षित करण्याचे आव्हानकान्हा व्याघ्रप्रकल्पाकडे भारतीय व विदेशी पर्यटकांचा ओढा ओसरला असल्याचे गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. २०१३-१४ मध्ये पर्यटकांच्या संख्येत किंचित वाढ झाली असली तरी ती फारशी समाधानकारक नाही. २०१०-११ मध्ये १ लाख ४० हजार ७०० भारतीयांनी तर ३४ हजार ०७३ विदेशी पर्यटकांनी कान्हा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. २०१३-१४ या वर्षात १ लाख १२ हजार ५३९ भारतीयांनी तर २१ हजार १३२ विदेशी पर्यटकांनी भेट दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजार १८५ भारतीय पर्यटक तर फक्त ३२ विदेशी पर्यटकांची वाढ झाल्याचे दिसून येते. व्याघ्र प्रकल्पात ९६ वाघ आणि ९६ बिबट असल्याची माहितीही देण्यात आली.
४ वर्षांत १७ वाघांची शिकार
By admin | Published: November 27, 2014 12:23 AM