नागपूर : १७ वर्षीय मुलीची गंभीर होत असलेली प्रकृती पाहून गरीब आई-वडिलांनी मोठ्या आशेने तिला यवतमाळहून नागपूरच्या मेडिकलमध्ये भरती केले. परंतु व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे कारण देत डॉक्टरांनी तिला ‘अंबू बॅग’वर ठेवले. सलग २४ तासांपेक्षा जास्त तास तिचे आई-वडील ‘अंबू बॅग’ दाबून कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न करीत होते. याची माहिती गुरुवारी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षकांनाही देण्यात आली. परंतु ती युवती ‘व्हीआयपी ’ नसल्याने तिला व्हेंटिलेटर मिळाले नाही. अखेर शुक्रवारी दुपारी तिचा मृत्यू झाला.
आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालयाची नागपूर मेडिकलची ओळख आहे. परंतु येथे सोयी उपलब्ध असताना रुग्ण वाचविण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नाची उणीव असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा पुढे आले. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी वैष्णवी राजू बागेश्वर हिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला १५ सप्टेंबर रोजी सकाळी मेडिकलच्या वॉर्ड क्र.४८ मध्ये भरती केले. तिच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. श्वास घेण्यासही त्रास होत होता. तिला व्हेंटिलेटरची गरज होती. परंतु व्हेंटिलेटर नसल्याने तिला ‘अंबू बॅग’वर ठेवले. याची माहिती सायंकाळी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांना देण्यात आली. परंतु त्यांनाही व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे शक्य झाले नाही. अखेर तिने शुक्रवारी दुपारी ‘अंबू बॅग’ वरच शेवटचा श्वास घेतला.
- वॉर्ड क्र. ४८ मधील दोन व्हेंटिलेटर बंद
वैष्णवीला भरती करण्यात आलेल्या वॉर्ड क्र. ४८ मध्ये दोन व्हेंटिलेटर आहे. परंतु दोन्ही बंद आहेत. दुरुस्तीसाठी कोणीच पाठपुरावा केला नसल्याची माहिती आहे.
- काय आहे अंबू बॅग
‘बॅग व्हॉल्व्ह मास्क’ किंवा ‘ मॅन्युअल रिसुसिटेटर ’ किंवा ‘सेल्फ-इन्फ्लेटिंग बॅग’ म्हणून ‘अंबू बॅग’ ओळखले जाते. व्हेंटिलेटर उपलब्ध होईपर्यंत नातेवाईकांना हाताने एक रबराचा फुगा दाबून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागतो. वैष्णवीचे आई-वडील सलग २४ तासांपेक्षा जास्त तास ते दाबत होते.
- मेडिकलमध्ये २२१ व्हेंटिलेटर
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या माहितीनुसार मेडिकलमध्ये २२१ व्हेंटिलेटर असून यातील १९६ सुरू आहेत. तरीही वैष्णवीला व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही. त्यावेळी या सर्व व्हेंटिलेटरवर रुग्ण होते का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
- गंभीर असताना सामान्य वॉर्डात उपचार
वैष्णवीची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी ही याची माहिती नातेवाईकांना दिली होती. परंतु त्यानंतरही तिच्यावर सामान्य वॉर्डात उपचार सुरू होते. तिला ‘आयसीयू’ मध्ये स्थानांतरीत का करण्यात आले नाही, हा प्रश्न आहे.