नागपूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शनिवारी १७० कोटीच्या तीर्थक्षेत्र अंभोरा विकास आराखड्याला मंजुरी प्रदान करण्यात आली. कुही तालुक्यातील अंभोरा तीर्थक्षेत्र या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. बैठकीपूर्वी विकास कामाबाबत सादरीकरणाचा आढावा घेण्यात आला.
अंभोरा तीर्थक्षेत्रात शिव मंदिर, बुद्ध विहार, व छोटा दर्गा असे भाग असून याची चार झोनमध्ये विभागणी करण्यात येईल. या क्षेत्रात पाच नद्यांचा संगम होत असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे येणार आहेत. भाविकांसाठी यात्री निवासाची व्यवस्था करण्यात येईल. पर्यटनासाठी हाऊस बोटिंग व वॉटर बोटिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच वृद्धांसाठी लिफ्टची व्यवस्था राहील. वैनगंगा नदीत बुद्धाची मूर्ती, शिवपिंड व त्रिशूल नव्याने निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. केज फिशींग व सोलर सिस्टीमसह मुलांसाठी चिल्ड्रेन पार्क तयार करण्यात येईल. या प्रकल्पास भंडारा जिल्हा लागून असल्याने तेथून मार्ग जोडण्यात येणार आहे. आ. राजू पारवे यांनी बैठकीत याबाबतची मागणी केली होती.
बॉक्स
शहरासाठी स्वतंत्र डीपीसीची पुन्हा मागणी
जिल्हा नियोजन समितीत सर्वाधिक सदस्य हे शहरातून येतात. मात्र निधी ग्रामीण भागाला जास्त मिळतो. त्यामुळे शहरासाठी स्वतंत्र डीपीसी असावी, अशी मागणी वेळोवेळी होत असते. या मागणीवरून अनेकदा सभेत गोंधळही झाला होता. तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळातही हा विषय निघाला तेव्हा त्यांनी शासनाच्या आदेशाचा हवाला देत एका जिल्ह्यात दोन डीपीसी करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते. शनिवारी आयोजित नियोजन समितीच्या बैठकीतही काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी शहरासाठी स्वतंत्र डीपीसीची मागणी केली. भाजपचे शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके व आ. कृष्णा खोपडे यांनीही या मागणीचे समर्थन केले. परंतु पालकमंत्र्यांनी या मागणीला विरोध केला.
समीर मेघे यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा
-बोथली येथील आरोग्य उपकेंद्र केवळ राजकारणामुळे रद्द करण्यात आले असल्याची टीका करीत याविरोधात आपण न्यायालयात जाऊ, असा इशारा भाजपचे आमदार समीर मेघे यांनी दिला.
महत्त्वाचे ठराव
- जिल्ह्यातील काटोल उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांचे करणार
- जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाला आर्थिक मदत
- कोविड काळातील कार्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणेच्या अभिनंदनाचा ठराव
- झिरो माईलचा विकास मेट्रो करणार