नागपूर : १३ टक्के व्याजाचे आमीष दाखवून तीन आरोपींनी २३ गुंतवणूकदारांचे १ कोटी ७१ लाख ७० हजार रुपये हडपले. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५ जून २०१९ ते ५ जून २०२० दरम्यान घडली.
विप्लवकुमार प्रेमकुमार उके (३५), अपूर्वा विप्लवकुमार उके (३२, दोघे रा. प्लॉट नं. १४३, धाडीवाल ले-आऊट, जोगीनगर अजनी) आणि जनरलसिंग लोहिया (४०, मिथिला सोसायटी, पिपळा, हुडकेश्वर) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी त्यांच्या फायनान्स कंपनीत गुंतवणूक केल्यास ४० ते ५० दिवसांत गुंतवणूक केलेल्या रकमेवर १३ टक्के व्याज तसेच गरज भासेल तेव्हा तत्काळ पैसे परत करण्याची हमी दिली.
आरोपींनी १५ जून २०१९ ते ५ जून २०२० दरम्यान मिलिंद गुज्जया धवडे (६३, दयालू सोसायटी, महावीरनगर जरीपटका) यांच्याकडून ५ लाख रुपये गुंतवून घेतले तसेच इतर २३ जणांकडून एकूण १ कोटी ७१ लाख ७० हजार रुपये घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा करून दिला नाही. गुंतवणूकदारांनी रक्कम परत मागितली असता आरोपींनी शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी मिलिंद धवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ५०४, ५०६, सह. कलम ४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.