विजय नागपुरे
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : ग्रामीण भागातील मजुरांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने कळमेश्वर तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण राेजगार याेजनेंतर्गत १५६ विविध कामे हाती घेण्यात आली. या कामावर तालुक्यातील १,०८९ कुटुंबातील १,७२५ मजुरांना ३१,०३३ दिवस राेजगार उपलब्ध करून देण्यात आला.
काेराेना संक्रमणामुळे उद्याेगधंदे बंद असल्याने ग्रामीण भागातील मजुरांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला हाेता. त्यातच उन्हाळ्यात शेतीची फारशी कामे नसल्याने त्यांना राेजगार मिळेनासा झाला हाेता. औद्याेगिक वसाहतीतील कारखान्यांनी काही काळ उत्पादन बंद ठेवल्याने ग्रामीण भागातील मजुरांच्या संख्येत भर पडली हाेती.
याच काळात प्रशासनाने वृक्ष लागवड, सिंचन विहीर, शोषखड्डे, नाडेप, फळबाग लागवड, वनपरिक्षेत्रातील कामे, बांधावर वृक्ष लागवड, सामाजिक वनीकरण, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकाम यासह मनरेगाच्या अन्य कामावर नाेंदणीकृत मजुरांसाठी कामे उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली.
मनरेगाअंतर्गत कुशल व अकुशल अशी दोन प्रकारची कामे दिली जातात. कुशल कामामध्ये बांधकाम साहित्याचा समावेश होतो तर, अकुशल कामामध्ये मजुरांचा समावेश आहे. या सर्व कामावरील मजुरांच्या मजुरीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा केली जाते. मजुरांना वेळेवर मजुरी मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
...
काेराेना संक्रमण काळात महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गरजू लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. अधिकाधिक लाेकांना त्यांच्याच गावात राेजगार उपलब्ध करून देण्याचा आमाचा प्रयत्न आहे. त्यामुळे तालुक्यात विविध स्वरूपाची कामे सुरू करण्यात आली. यात वृक्ष लागवड व संगोपन, शोषखड्डे (सामूहिक व वैयक्तिक), फळबाग, घरकुल, विहिरी यासह नाला खोलीकरण, शेततळे, तलाव खोलीकरण या सामूहिक स्वरूपाच्या कामाचा समावेश आहे. जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध होईल, यादृष्टीने कामाचे नियोजन केले जात आहे.
- संदीप गोडशलवार,
गट विकास अधिकारी (नरेगा), जि.प. नागपूर.