नागपूर, यवतमाळ : संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मालिका एसटी महामंडळाने सुरू केली. मंगळवारी पहिल्या दिवशी कारवाईचा पहिला दणका विदर्भावर देण्यात आला. राज्यभरातून निलंबित करण्यात आलेल्या ३७६ पैकी सर्वाधिक १७३ कर्मचारी विदर्भातील आहे. यात यवतमाळचे ५७, तर त्याखालोखाल वर्धा जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा ४० क्रमांक लागतो. सहा विभागांतील १८ आगारामधील कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी गेली १३ दिवसांपासून संप पुकारला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही कर्मचारी कामावर परतले नाहीत. बंद पडणाऱ्या आगाराची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच गेली. सोमवारच्या शासन निर्णयानंतरही संपाची धग कायम आहे. मंगळवारी हा संप अधिक चिघळला.राज्यभरातील सर्व आगारांतील वाहतूक बंद झाली.
महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा सपाटा लावला. याची पहिली यादी जाहीर करण्यात आली. विदर्भातील नागपूर, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या सहा विभागांतील कर्मचारी मोठ्या संख्येने निलंबित करण्यात आले आहे. आणखी हा आकडा वाढणार आहे. या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वर्धा विभागातील वर्धा, हिंगणघाट, पुलगाव व आर्वी आगारातील प्रत्येकी दहा असे ४० कर्मचारी निलंबित करण्यात आले. गडचिरोली विभागातील अहेरी, ब्रह्मपुरी, गडचिरोली आगारातील १४, चंद्रपूर विभागातील चंद्रपूर व राजुरा आगारातील प्रत्येकी पाच, तर विभाग नियंत्रक कार्यालयातील चार अशा १४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. भंडारा विभागातील तुमसर, तिरोडा, गोंदिया आगाराचे ३०, यवतमाळ विभागातील पांढरकवडा, राळेगाव, यवतमाळ आगाराचे ५७, तर नागपूर विभागातील गणेशपेठ व घाटरोड आगारातील प्रत्येकी एक, वर्धमान नगर आगारातील सात आणि इमामवाडी आगारातील नऊ अशा १८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली.