लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात चालू खरीप हंगामामध्ये सततचा पाऊस व पुरामुळे १३ तालुक्यांमधील एकूण २,१३,७१० शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची नाेंद महसूल विभागाने केली. प्रति हेक्टरी १८ हजार रुपयांप्रमाणे (कमाल दाेन हेक्टर) जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे १०९ काेटी ७८ लाख ६८ हजार रुपयांची मागणी केली. प्रशासनाने मिळालेल्या ३६ काेटी ९ लाख १२ हजार रुपयांमधून ३९,८८९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली. मात्र, जिल्ह्यातील १,७३,७१० शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाईची प्रतीक्षा कायम आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ)च्या निकषानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान क्षेत्र नरखेड तालुक्यात आहे. या तालुक्यात ६३० शेतकऱ्यांचे २३२.९३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची नाेंद करण्यात आली. त्याखालाेखाल हिंगणा व कुही तालुक्यातील नुकसान दर्शविले आहे. काटाेल तालुक्यातील ११८ शेतकऱ्यांचे ९१ हेक्टरमधील नुकसान दर्शविण्यात आले आहे. पुरामुळे सावनेर, कामठी व माैदा तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. वास्तवात, नुकसानीचा आकडा यापेक्षा अधिक आहे.
जिल्हा प्रशासनाने २,१३,७१० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाकडे १०९ काेटी ७८ लाख ६८ हजार रुपयांची मागणी केली हाेती. परंतु, प्रशासनाला आजवर ३६ काेटी ९ लाख १२ हजार रुपये दिले. त्यामुळे जिल्ह्यातील ३९,८८९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकली. दुसरीकडे, प्रशासनाला उर्वरित ७३ काेटी ६९ लाख ५६ हजार रुपयांच्या निधीची प्रतीक्षा असल्याने १,७३,८२१ शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळू शकली नाही. दुसरीकडे, जिल्ह्यात किडी व राेगाच्या प्रादुर्भावामुळे साेयाबीनचे पीक पूर्णपणे नष्ट झाले. कपाशी, तूर, मूग उडीद याही पिकांना किडींचा जबर फटका बसला आहे. परंतु, प्रशासनाने किडींमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षणच केले नाही. त्यामुळे शासनाने त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसली आहेत.
मदतीसाठी एकूण निधीची मागणी
१०९७८६८०००
प्राप्त झालेला निधी
३६०९१२०००
जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी
२१३७१०
मदतीचा लाभ मिळालेले शेतकरी
३९८८९
मदतीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी
१७३८२१
जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाला वेळावेळी सादर करण्यात आला. शासनाकडून टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त हाेताे.
प्राप्त निधी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. उर्वरित निधी प्राप्त झाला की ताेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.
- रवींद्र ठाकरे
जिल्हाधिकारी, नागपूर
पावसामुळे साेयाबीन, कपाशीसह अन्य पिके व माेसंबीचे प्रचंड नुकसान झाले. साेयाबीनवर राेटाव्हेटर चालवावे लागले. शासनाने सर्वेक्षणही केले. मात्र, नुकसान भरपाईचा एक पैसाही अद्याप मिळाला नाही. शासनाने नुकसान भरपाई देताना केवळ पूरग्रस्तांना प्राधान्य दिले आहे. इतर शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा.
- मनाेज जवंजाळ
शेतकरी, काटाेल