- विक्रीकर उपायुक्तांनी पकडली व्हॅट करचोरी : सहा भागीदारांविरुद्ध सोनेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा
नागपूर : मद्याची बॉटलिंग व पॅकेजिंग करणाऱ्या नागपुरातील सहा मद्य व्यावसायिकांवर १७.५० कोटींच्या व्हॅट कर चोरी प्रकरणात केंद्रीय सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा नोंदवून (ईसीआयआर) समन्स जारी करून चौकशीसाठी बोलविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विदर्भ बॉटलर्स प्रा.लि., वर्धा रोड, चिंचभुवन असे फर्मचे नाव असून अमरेश सुरेश जयस्वाल, संजू सुरेश जयस्वाल, सुरेश भय्यालाल जयस्वाल, वैभव जयस्वाल, विशाल जयस्वाल आणि देवीलाल जयस्वाल अशी या फर्मच्या सहा भागीदारांची नावे आहेत. या मद्य व्यावसायिकांवर विक्रीकर चोरीच्या प्रकरणात सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. या प्रकरणाची तपासणी आर्थिक गुन्हे शाखाा पोलिसांनी पाच वर्ष केली होती. तपासणीपूर्वी लाखो रुपयांत असलेला हा घोटाळा १७.५० कोटींच्या व्हॅटकर चोरीपर्यंत पोहोचला होता. त्यामुळेच हे प्रकरण आता ईडीकडे सोपविण्यात आले आहे.
विदर्भ बॉटलर्स प्रा.लि.मध्ये देशी मद्याची बॉटलिंग व पॅकेजिंगचे काम व्हायचे. येथे देशी मद्य निर्मितीसह पॅकेजिंग करून विक्री करण्यात येत होती. या फर्मला व्हॅल्यू अॅडेड टॅक्स कायदा-२००२ अंतर्गत नोंदणीकृत करण्यात आले आहे. या फर्ममधून मद्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्यानंतरही पाच वर्षांपर्यंत कोणत्याही प्रकारचा व्हॅट भरला नाही. या कर चोरीच्या प्रकरणात विक्रीकर विभागाचे तत्कालीन उपायुक्त गजेंद्र राऊत यांनी २७ फेब्रुवारी २०१६ रोजी सहा भागीदारांविरुद्ध सोनेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. या सहाही भागीदारांनी सन २०११-१२, २०१२-१३, २०१३-१४, २०१४-१५ आणि २०१५-१६ मध्ये खरेदी-विक्रीचा निरंक रिटर्न दाखविण्याचा आरोप आहे.
पाच वर्ष जेल व १७.५० कोटींची
संपत्ती जप्त होण्याची शक्यता
या मद्य निर्मात्यांची चौकशी ईडीकडे आल्यामुळे या प्रकरणात अनेक रहस्यमय गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर शिक्कामोर्तब झाल्यास सहाही भागीदारांची १७.५० कोटींची संपत्ती जप्त होऊ शकते आणि त्यांना पाच वर्षांची जेल होऊ शकते, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली.