लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भात दोन दिवसांत १७९ रुग्णांचा मृत्यू तर ६,५१२ रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १, १२,३२७ झाली असून मृतांची संख्या ३,००५वर पोहचली आहे. शुक्रवारी सर्वाधिक रुग्णांची नोंद नागपूर, अमरावती, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात झाली. धक्कादायक म्हणजे, नागपुरात ४५, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढतच चालला आहे. आज १,७०३ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ६०,९०२वर गेली आहे, तर मृतांची संख्या १,९३५ झाली आहे. विशेष म्हणजे, बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक राहिली. ३,०२४ रुग्ण बरे झाल्याने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४८,३९६ झाली आहे. अमरावती जिल्ह्यात ४३० नव्या रुग्णांची भर पडली. आतापर्यंतची ही सर्वाधिक नोंद आहे. रुग्णसंख्या १०,१०३ झाली असून एका रुग्णाच्या मृत्यूने मृतांची संख्या २१९ वर गेली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. एकाच दिवसात ३५४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्येत ही सर्वात मोठी भर आहे. रुग्णसंख्या ६,७५४ झाली आहे. १० रुग्णांचा बळी गेला असून मृतांची संख्या १९७ वर पोहचली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णसंख्येसोबतच मृतांची संख्या वाढत आहे. ३०३ रुग्ण पॉझिटिव्ह तर १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या ७,२७९ झाली असून मृतांची संख्या १०५ वर गेली आहे. वर्धा जिल्ह्यात १७० रुग्ण पॉझिटिव्ह आले असून सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या ३,१५८ तर मृतांची संख्या ८० झाली आहे.
अकोला जिल्ह्यात ९८ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले, तर सात रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ६,२६५ तर मृतांची संख्या २०३ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ९३ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णसंख्या ५,५९७ वर गेली आहे. भंडारा जिल्ह्यात ८६ रुग्ण पॉझिटिव्ह तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाशिम जिल्ह्यात ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात ५५ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या १,८९६ झाली आहे.